ज्येष्ठ सनदी लेखापालासांठी 'वी केअर' अभियान

Chartered_Accountant
Chartered_Accountant

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लेखापरिक्षण व्यवसायातील वरिष्ठांच्या सुरक्षिततेची जबाबदारी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) घेतली आहे. या व्यवसायातील वरिष्ठांचे योगदान लक्षात घेऊन ज्येष्ठ सनदी लेखापालांसाठी 'वी केअर' हे नाविन्यपूर्ण अभियान 'आयसीएआय'ने हाती घेतले आहे. 

या अभियानाचे केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते नुकतेच दृकश्राव्य पद्धतीने उद्घाटन झाले. याप्रसंगी 'आयसीएआय'चे अध्यक्ष सीए अतुल कुमार गुप्ता, उपाध्यक्ष सीए निरंजन जांबूसारिया यांच्यासह केंद्रीय समितीचे सदस्य, 'पुणे आयसीएआय'चे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष सीए समीर लड्ढा आदी उपस्थित होते.

'वी केअर' अभियानांतर्गत ज्येष्ठांसाठी तंत्रज्ञानाधारित साहाय्य पुरविणारी 'इकोसिस्टिम' तयार करणे, २४ बाय ७ मदतीसाठी हेल्पलाईन आणि वैद्यकीय उपचार व इतर गोष्टींसाठी आर्थिक, तसेच आवश्यक ते सहाय्य याअंतर्गत करण्यात येणार आहे. कार्यक्रमात मेघवाल म्हणाले, "राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर व्यवसायातील प्रगतीसाठी 'आयसीएआय' महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सर्व क्षेत्रातील व्यवसाय, उद्योग आणि वाणिज्य क्षेत्रातही त्यांचा हातभार आहे. ज्येष्ठ आणि युवा पिढीतील नाते दृढ करण्याच्या भारतीय परंपरेला 'वी केअर'सारखे अभियान बळकटी देईल."

गुप्ता म्हणाले, "संस्था सातत्याने आपल्या सर्व सदस्यांसाठी सर्वोत्तम गोष्टी करण्यास इच्छुक असते. सदस्यांच्या सुधारणा आणि प्रगतीसाठी प्रयत्न करते. गेल्या काही वर्षांमध्ये बदलत्या व्यावसायिक वातावरणाला निर्णायक कृती आणि विवेकी प्रतिक्रियांच्या माध्यमातून सामोरे जाताना ज्येष्ठ सीए सदस्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या व्यावसायिक प्रगती आणि पाठबळाचा लाभ झालेला आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञ भावनेतून हा उपक्रम हाती घेतला आहे."

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com