Success Story : २१ व्या वर्षी तो बनला न्यायाधीश!

टीम ई-सकाळ
Saturday, 31 October 2020

लोकांना न्यायपालिकेवर विश्वास असल्याचे मी पाहिले आहे. त्यांना न्याय मिळवण्यासाठी मी इकडे तिकडे धावताना पाहिले आहे, म्हणून मी हेच माझे करिअर निवडले.

जयपूर (राजस्थान) : २१ वर्षीय मयंक प्रताप सिंह (Mayank Pratap Singh) हा भारतातील सर्वात युवा न्यायाधीश बनला आहे. मयंक हा राजस्थानच्या जयपूर शहराचा स्थानिक रहिवासी आहे. त्याने न्यायिक सेवा परीक्षा २०१८ (Judicial services 2018) परीक्षा पास केली आणि आता भारतातील सर्वात तरुण न्यायाधीश बनण्याचा मान त्याने पटकावला आहे.

परीक्षेत मिळालेल्या या घवघवीत यशानंतर मयंक म्हणाला, 'न्यायालयीन सेवांकडे आणि समाजात न्यायाधीशांना मिळणाऱ्या आदराकडे मी नेहमीच आकर्षित झालो आहे. २०१४ मध्ये राजस्थान विद्यापीठात पाच वर्षांच्या एलएलबी कोर्समध्ये प्रवेश घेतला होता. तेव्हापासून माझा हा प्रवास सुरू झाला होता.'

अशी सुधारा स्मरणशक्ती!​

आपल्याला मिळालेल्या यशाबद्दल सांगताना मयंक म्हणाला, ''मी कोणतीही कोचिंग क्लास जॉईन केली नव्हती. तसेच फेसबुक किंवा व्हॉट्सअॅप या सोशल मीडियाचा वापरही केला नाही. दररोज ६-८ तास अभ्यास करायचो. कधी कधी मी १२ तासही अभ्यास केला आहे. मी माझा जास्तीत जास्त वेळ अभ्यासामध्ये घालवला. कायद्याशी संबंधित नवीन माहिती मिळवण्यासाठी तसेच सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट यांनी नुकत्याच घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांबाबतची माहिती मिळविण्यासाठी मी इंटरनेटचा वापर करायचो."

तो पुढे म्हणाला, 'सोशल मीडियावरून गायब झाल्यामुळे माझ्या अनेक मित्रांनी माझी चेष्टा केली. काही काळ गेल्यानंतर त्यांना आणि मलाही याची सवय झाली. अभ्यासावरच पूर्ण लक्ष्य केंद्रित केले होते. लोकांना भेटणे टाळायचो, पण जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी जायचो.' 

मनातलं : कठीण विषय शिकायचे तंत्र : इंटरलिव्हिंग​

न्यायाधीश का व्हायचे ठरवले असे विचारले असता मयंक म्हणाला, "लोकांना न्यायपालिकेवर विश्वास असल्याचे मी पाहिले आहे. त्यांना न्याय मिळवण्यासाठी मी इकडे तिकडे धावताना पाहिले आहे, म्हणून मी हेच माझे करिअर निवडले."

मयंक पुढे म्हणाला, '२०१८ पर्यंत न्यायालयीन सेवा परीक्षेसाठी २३ वर्षे ही वयोमर्यादा होती. मात्र, २०१९ मध्ये राजस्थान हायकोर्टने ती २१ वर्षे केली. त्यामुळे याचा मला फायदा झाला.  मला मिळालेल्या यशाचा मला अभिमान असून यासाठी मी माझे कुटुंबीय, शिक्षक आणि हितचिंतकांचे आभार मानतो.' 

'परीक्षेला बसण्याचे वय कमी झाल्यामुळेच मी या परीक्षेसाठी पात्र ठरू शकलो. यशाची मला खात्री होती, परंतु पहिला येईन, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मला मिळालेल्या या संधीचा फायदा घेऊन लवकरच मी बर्‍याच नव्या गोष्टी शिकू शकेन, असे मला वाटते. न्यायालयीन सेवा प्रामाणिकपणे करेन,' असे मनोगतही त्याने माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. 

भविष्य नोकऱ्यांचे : न्यूरल नेटवर्क प्रारूप​

मयंकचे वडील राजकुमार सिंह हे सरकारी शाळेचे मुख्याध्यापक आहेत आणि आई देखील सरकारी शाळेत शिक्षिका आहे. सोशल मीडियातून मयंकवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. तसेच त्याचे अभिनंदन केले. पदवीच्या शेवटच्या परीक्षेनंतर केवळ दोन महिन्यात मयंकने न्यायालयीन सेवा परीक्षा दिली आणि पहिल्या प्रयत्नातच घवघवीत यश संपादन केले. सर्वात तरुण न्यायाधीश बनलेला मयंक कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayank Pratap Singh from Jaipur became Indias youngest judge