#WeCareForPune कोथरूडमध्ये खेळांसाठी हव्यात सुविधा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

कोथरूडमध्ये महापालिकेचे सर्वसुविधांनी युक्त असे मैदान, कबड्डी खेळाडूंसाठी मॅट, ॲथलेटिक खेळाडूंसाठी सिंथेटिक ट्रॅक, कुस्ती, खो-खो आदी खेळांसाठी मार्गदर्शक उपलब्ध करून द्यावेत, अशा अपेक्षा खेळाडूंनी ‘सकाळ संवाद’मध्ये व्यक्त केल्या.

पौड रस्ता - कोथरूडमध्ये महापालिकेचे सर्वसुविधांनी युक्त असे मैदान, कबड्डी खेळाडूंसाठी मॅट, ॲथलेटिक खेळाडूंसाठी सिंथेटिक ट्रॅक, कुस्ती, खो-खो आदी खेळांसाठी मार्गदर्शक उपलब्ध करून द्यावेत, अशा अपेक्षा खेळाडूंनी ‘सकाळ संवाद’मध्ये व्यक्त केल्या.

शंकरराव मोरे विद्यालयाच्या मैदानावर ‘सकाळ संवाद’तर्फे बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी सहभागी युवा खेळाडूंनी क्रीडा पोषक धोरण राबविणारे लोकप्रतिनिधी हवेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेळी प्राजक्ता शिंदे, सानिका खाडे, प्रथमेश कुडले, प्रसाद घारे, मनोज खडके, कुणाल पाटील, वैभव डोंगरे, अमोल येमदे, अजय हुलावळे, सिद्धेश जावळे, उस्मान राजपूत, विनायक जाबरे, नामदेव काजळे, ओम शिंदे, भूमिपुत्र कांबळे, रोहित कट्टीमनी, रोहन सुतार, अखिलेश टेकाळे, आकाश बोंदरे, निखिल ठोंबरे, दीपक शर्मा आदी खेळाडू उपस्थित होते.

मी कबड्डीपटू आहे. परंतु, आम्हाला प्रॅक्टिससाठी मैदान उपलब्ध नाही. भारती विद्यापीठाच्या मैदानात आम्ही सराव करतो. परंतु, हे खासगी मैदान आहे. कोथरूडमध्ये महापालिकेचे सर्व सोयीसुविधांनी युक्त असे मैदान उपलब्ध करून दिल्यास खेळाडूंना आपले कौशल्य वाढविणे शक्‍य होईल.
- शाखीर शेख

खेलो इंडिया ही स्पर्धा देशपातळीवर सरकारने आयोजित केली. परंतु आजही त्या खेळाडूंचे मानधन देण्यात आलेले नाही. या स्पर्धेमध्ये साडेतीन हजार खेळाडूंनी सहभाग घेतला. या खेळाडूंना सरकारने एक कमिटमेंट केली होती, की दैनंदिन सरावासाठी मैदान व कोचिंग उपलब्ध करून दिले जाईल. पण, ते अजूनही दिलेले नाही.
- सागर खळदकर, प्रशिक्षक

भारती विद्यापीठाने २०१४ साली मला कबड्डीचा राष्ट्रीय खेळाडू असल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यानंतर पोलिस भरती झालीच नाही. पाच टक्के आरक्षणातसुद्धा आम्हा खेळाडूंना जागा देण्यात आली नाही. २०१८ मध्ये हायकोर्टाने विद्यापीठ खेळाडूंना पाच टक्के आरक्षण द्यावे, असे सांगितले. परंतु, क्रीडामंत्र्यांनी न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही.
- सिद्धार्थ लिम्हण

मी ॲथलेटिक खेळाडू आहे. आम्हाला सरावासाठी सिंथेटिक ट्रॅकची गरज आहे. ते फक्त सणस मैदान येथेच आहे. कोथरूड परिसरात सिंथेटिक ट्रॅक झाला, तर खेळाडूंचे भविष्य उज्ज्वल होईल. सध्या मी दररोज कर्वेनगरहून कोथरूडला सायकलवर सरावासाठी येतो.
- बिवांशू दुवेदी

कबड्डीच्या जिल्हास्तरीय स्पर्धा होतात. तेथे खेळाडू जखमी होण्याचे प्रमाणही जास्त असते. अशा वेळी रुग्णवाहिका उपलब्ध असेल, तर खेळाडूंवर तातडीने उपचार करणे शक्‍य होते. परंतु, आपल्याकडे जिल्हास्तरीय स्पर्धेच्या क्रीडांगणावर रुग्णवाहिका उपलब्ध नसते, हे दुर्दैव आहे. 
- शेखर बंगले

आम्ही सरावासाठी बाहेर जातो. घरी परतायला उशीर होतो. त्या वेळी टवाळखोर मुले छेड काढण्याचा प्रयत्न करतात. मी कबड्डी खेळाडू असल्यामुळे अशा प्रसंगाला तोंड देऊ शकते. परंतु, सगळ्या मुलींना ते शक्‍य होत नाही. आईवडील घाबरून मुलींचे बाहेर जाणे बंद करतात. एकीकडे सरकार म्हणते बेटी बचाओ, बेटी पढाओ. पण, तिला सुरक्षित वातावरण कोण देणार? मुलींना जर सुरक्षित वातावरण नसेल, तर मुली खेळाडू कशा बनतील.
- धनश्री जायगुडे 

कबड्डीसारखे खेळ आता मॅटवर खेळले जात आहेत. आम्ही अजूनही मातीच्या मैदानावरच सराव करतो. कबड्डी खेळात अधिक प्रगती होणे अपेक्षित असेल, तर महापालिकेने, सरकारने कबड्डी खेळाडूंनासुद्धा मॅट उपलब्ध करून द्यावी.
- नीलेश सकपाळ 

Web Title: We Care For Pune Sakal Sanwad Kothrud Play Facility