भाजपच्या बारामतीतील कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार : हर्षवर्धन पाटील

मिलिंद संगई
Monday, 5 October 2020

पक्ष बारामतीत भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, अशी ग्वाहीही पाटील यांनी या वेळी दिली. 

बारामती : सरकार आज आहे तर उद्या नाही, बारामतीत भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर पोलिसांत गुन्हे दाखल केले जात आहेत, पक्षस्तरावर याची दखल घेतली गेली आहे, या बाबत लवकरच पक्षीय पातळीवर काहीतरी निर्णय होईल, अशी माहिती माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली. दरम्यान आपण बारामतीतील भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे आहोत, अशी ग्वाही देण्यास पाटील विसरले नाहीत. 

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; अंतिम वर्ष परीक्षेचं वेळापत्रक झालं जाहीर!

बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सवलतीच्या दरात वस्तूवाटप, सेवाकार्य पुस्तिकेचे प्रकाशन व पदाधिकारी निवड असे उपक्रम पार पडले. या प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी वरील वक्तव्य केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 

बारामतीत भाजप कार्यकर्त्यांवर किरकोळ आंदोलन केले तरी लगेचच गुन्हे दाखल करुन कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे, वरिष्ठ स्तरावर पोलिसांच्या या कारवाईची माहिती देण्यात आली असून, या बाबत पक्षस्तरावर काहीतरी निर्णय होईल, असा एक प्रकारे इशाराच पाटील यांनी या प्रसंगी दिला. केंद्राच्या माध्यमातून राज्याला भरीव निधी दिला जात आहे, त्याची माहिती जनतेपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहचवावी, पक्ष बारामतीत भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, अशी ग्वाहीही पाटील यांनी या वेळी दिली. 

कोरोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे, शेतकरीही नाराज आहे, बारामतीतही भाजप कार्यकर्त्यांवर आकस ठेवून गुन्हे दाखल होत आहेत, कार्यकर्त्यांनी या जुलमी राजवटीविरोधात एकत्रित काम करावे असे आवाहन गणेश भेगडे यांनी केले. 

तर एक नोव्हेंबरपासून मराठा समाज रस्त्यावर उतरेल; विनायक मेटे यांचा इशारा

तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी तालुका स्तरावर पक्षाची मोट बांधू अशी ग्वाही दिली तर उंडवडीच्या श्री भैरवनाथ मंदीरातून परिवर्तनाची नांदी सुरु झाल्याचे प्रशांत सातव यांनी नमूद केले. 

या प्रसंगी दादा सातव, प्रवीण काळभोर, सतीश फाळके, जी. बी. गावडे, गोविंद देवकाते, ज्ञानेश्वर माने, सचिन मलगुंडे, धनंजय गवारे, अभिजित देवकाते, प्रवीण आटोळे, सुनील माने, श्याम कोकरे, युवराज तावरे, पोपटराव खैरे, अँड. जी. के. देशपांडे,  सुधाकर पांढरे, भारत देवकाते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद खराडे, शंभूदादा पानसरे, जयराज बागल, भूषण जराड, विशाल कोकरे आदींनी केले. सरक सर यांनी सूत्रसंचालन केले, प्रमोद खराडे यांनी आभार मानले. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: we stand behind the BJP workers in Baramati says harshvardhan patil