'..तर आम्हालाही आत्महत्या कराव्या लागतील!'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 October 2020

कोरोनामुळे जवळपास 7 महिने कोणतेही जाहीर कार्यक्रम झाले नाहीत. त्यामुळे यासंबंधित क्षेत्रात काम करणारे साउंड, लाईट, एलईडी वॉल, जनरेटर्स, ट्रस, कलाकार, फ्लोरिस्ट, डेकोरेटर्स, मंडप, व्हिडीओग्राफर्स, फोटोग्राफर्स, बॅंड, इव्हेन्ट कोऑर्डिनेटर डी. जे. असे अनेक व्यवसाय ठप्प आहेत.

पुणे : 'आम्ही सारे कलाकार, झालो बेकार', 'काम बंद घर कसे चालवू', 'व्यवसाय बंद हप्ते कसे फेडू', 'सामान धूळ खात पडलेय, गोडाऊनचे भाडे कसे भरू?' असे प्रश्न उपस्थित करत पुणे साउंड इलेक्‍ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्‌स इक्विपमेंट्‌स व्हेंडर असोसिएशनने मूकमोर्चा आणि धरणे आंदोलन केले. 'अनलॉक'च्या प्रक्रियेत सगळेच सुरु होतेय, मग केवळ इव्हेंट्‌सवर बंदी का? त्यानेच कोरोनाचा धोका अधिक आहे का? असा संतप्त सवाल व्यावसायिकांनी केला. तसेच सरकारने लवकरात लवकर जाहीर कार्यक्रमांना परवानगी दिली नाही, तर आम्हालाही आत्महत्या कराव्या लागतील, असा इशारा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

बार, हॉटेलचालकांनो, आता नियम मोडू नका नाहीतर... 

महाकला मंडळ, मंडप ओनर्स वेल्फेअर असोसिएशन, पिंपरी-चिंचवड साउंड लाईट असोसिएशन, प्रोफेशनल ऑडिओ अँड लाईट असोसिएशन (पाला), कलाकार महासंघ, पुणे फुलबाजार अडते असोसिएशन, खडकी मंडप असोसिएशन, साउंड लाईट असोसिएशन सातारा, साउंड लाईट असोसिएशन फलटण आदी संस्थांचा या आंदोलनात समावेश होता. यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमझानी, माजी अध्यक्ष शिरीष पाठक, उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, सोमनाथ धेंडे, सूर्यकांत बंदावणे, 'पाला'चे अध्यक्ष किशोर म्हात्रे, मेहबूब पठाण, उदय शहा, बंडूशेठ वाळवेकर, सचिन नसरे, स्टीवन नॅथन, उदय इनामके, अझीज शेख, मृणाल ववले आदी उपस्थित होते. धरणे आंदोलनानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

'सवाई' महोत्सव होणार की नाही? वाचा आयोजकांचे काय म्हणणे आहे?

"कोरोनामुळे जवळपास 7 महिने कोणतेही जाहीर कार्यक्रम झाले नाहीत. त्यामुळे यासंबंधित क्षेत्रात काम करणारे साउंड, लाईट, एलईडी वॉल, जनरेटर्स, ट्रस, कलाकार, फ्लोरिस्ट, डेकोरेटर्स, मंडप, व्हिडीओग्राफर्स, फोटोग्राफर्स, बॅंड, इव्हेन्ट कोऑर्डिनेटर डी. जे. असे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. लाखो रुपयांची इक्विपमेंट्‌स धूळ खात पडून आहेत. तर या व्यवसायावर उपजीविका अवलंबून असलेल्या जवळपास चार ते पाच लाख लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने याचे गांभीर्य ओळखून इतर व्यवसायाप्रमाणे अटी-शर्थींसह आम्हालाही जाहीर कार्यक्रम आयोजिण्यास त्वरित परवानगी द्यावी.''
- बबलू रमझानी, अध्यक्ष, पुणे साउंड इलेक्‍ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्‌स इक्विपमेंट्‌स व्हेंडर असोसिएशन.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: we will commit suicide warned sound association officials to state govt