'पद्मश्री' सन्मानित म्हणतात, आम्ही काही अफगाणी, पठाणी नाही आहोत...

Untitled-9.jpg
Untitled-9.jpg

पुणे ः "आमचे पुर्वज हिंदूच होते, ते कोणी अफगाणी, पठाणी नव्हते, त्यामुळे आम्ही 100 टक्के भारतीयच आहोत. असे असतानाही नागरीकत्व दुरूस्ती कायद्याद्वारे (सीसीए) केवळ मुस्लिमांनाच आपले भारतीयत्व सिद्ध करावे लागणे हे दुर्दैवी आहे."सीएए' विरुद्ध देशभर आंदोलने, मोर्चे सुरू आहेत. लाखो महिला रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे त्यांचे म्हणणे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारने ऐकलेच पाहीजे.'' अशा परखड शब्दात "पद्मश्री' सन्मान जाहीर झालेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यदभाई यांनी केंद्र सरकारचे कान टोचले आहेत. 

केंद्र सरकारच्यावतीने प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला मानाच्या "पद्म' पुरस्कार जाहीर केले. त्यामध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळाद्वारे समाजाच्या उन्नतीसाठी आपले संपुर्ण आयुष्य वेचणाऱ्या सय्यदभाई यांनाही "पद्मश्री' जाहीर करण्यात आला. या पार्श्‍वभुमीवर त्यांच्याशी "सकाळ'ने संवाद साधला. त्यावेळी सय्यदभाई यांनी आपल्या संघर्षमय आयुष्याचे अनेक पदर उलगडले. 

बहिणीपासून सुरू झाली "तलाक बंदी'ची चळवळ 
माझ्या धाकट्या बहिणीला दोन मुले असताना तिच्या नवऱ्याने तिला तीन तलाक देत सोडून दिले. मी जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्‍य झाले नाही. ही जखम मनाला लागली. तेव्हापासूनच तोंडी तलाक पद्धत थांबली पाहीजे, यासाठी लढा सुरू केला. हमीद दलवाई यांच्यासमवेत मार्च 1970 मध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. त्याद्वारे तोंडी तलाक, दत्तक मुल घेण्याची परवानगी द्यावी, चार लग्नाची पद्धत मोडण्यासाठी काम सुरू केले. दलवाई यांच्या निधनानंतरही चळवळ जोमोने सुरू ठेवले. पुढे समान नागरीक कायद्यासाठी काम सुरू केले. मोर्चे, आंदोलने काढून आवाज उठविला. 

'लोकांनी शिव्या दिल्या, दगड मारले' -
वयाच्या 22 वर्षी काम सुरू केले. धर्माच्या परंपरांच्याविरोधात आवाज उठवित असल्यामुळे मलाही समाजाने लक्ष्य केले होते. शिवीगाळ केली, अक्षरशः दगड मारले. परंतु मी त्याची कुठलीही पर्वा केली नाही. चळवळ पुढे सुरूच ठेवली. लखनौ, दिल्ली, अलाहाबाद, कानपूर, महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात मुस्लिम सत्यशोधक मंडळीच्या शाखा काढल्या. तरुणांना बळ देऊन त्यांनाही या कामामध्ये आणले. मानवता हाच खरा धर्म मानून त्यादृष्टीने आज वयाच्या 83 व्या वर्षीही मी काम सुरूच ठेवले आहे. 

बलात्कारमुक्त भारत अभियानाचे आता आव्हान 
आत्तापर्यंत तलाकपिडीत महिलांसाठी सत्याग्रही पद्धतीने संघर्ष केला. त्यांना न्याय मिळवून दिला. आता देशभरामध्ये वाढत्या बलात्काराच्या घटना पाहून आम्ही "बलात्कारमुक्त भारत अभियान' सुरू करण्याचे ठरविले आहे. हे अभियानदेखील देशभर राबविण्यात येणार आहे. तेच आमच्यापुढचे महत्वाचे आव्हान आहे. मात्र ते पार पाडण्यासाठी माझ्यासह हजारो कार्यकर्ते जिद्दीने काम करणार आहेत. 

समान नागरीक कायद्याची मागणी- मुस्लिम सत्यशोध मंडळाच्या कार्यकर्त्यांसमवेत 17 डिसेंबर 2017 या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्याशी तोंडी तलाक, समान नागरीक कायद्याची मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी दोन्ही मागण्या मान्य करुन त्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले होते. तोंडी तलाक कायद्यानंतर आता समान नागरीक कायदा होण्याची आम्ही वाट पाहत आहोत. 

"सीएए' केवळ मुस्लिमांनाच का ? 
"सीएए'च्या नावाखाली फक्त मुस्लिमांनीच आपला सातबारा का दाखवावा. अन्य धर्मीयांकडूनही तशीच मागणी करावी. आमचे पुर्वज याच मातीत जन्मले. त्यांनी देशासाठी प्राण दिले. आम्हीही याच देशाचे नागरीक आहोत. या मातृभुमीचीच लेकरे आहोत. आम्ही इथेच जगू, वेळप्रसंगी देशासाठी प्राणही देऊ. पण आम्हाला बाजूला काढण्याचा प्रयत्न करु नका. कोणतेही सरकार हे न्यायिक भुमिकेत असले पाहीजे. त्यामुळे या सरकारनेही "सीएए'च्या विरोधात रस्त्यावर उतरणाऱ्यांचे ऐकून घेतले पाहीजे. पहिल्यांदाच लाखो मुस्लिम महिला रस्त्यावर उतरुन आंदोलन, उपोषण करीत आहेत.त्यासाठी सरकारने आंदोलनकर्त्यांचे, महिलांचे ऐकले पाहीजे. चर्चेतून नक्कीच मार्ग निघेल. मात्र सरकारने कोणत्याही प्रकारचे वेडेवाकडे राजकारण करु नये. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com