दौंड - लोणावळा दरम्यान लोकलसाठी सकारात्मक कार्यवाही करू : पीयुष गोयल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

दौंड - पुणे - लोणावळा दरम्यान मेमू (मेन लाईन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) लोकल सेवा सुरू करण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी दिले आहे. 

दौंड (पुणे) : दौंड - पुणे - लोणावळा दरम्यान मेमू (मेन लाईन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) लोकल सेवा सुरू करण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी दिले आहे. 

नवी दिल्ली येथे काल (ता. २५) पीयुष गोयल यांना राज्यसभेचे खासदार तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या शासकीय निवासस्थानी एका बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले होते आणि त्यामध्ये गोयल यांनी हे आश्वासन दिले. शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुचनेनूसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा वैशाली नागवडे आणि सोहेल खान यांनी सदर बैठकीत विविध मागण्या मांडल्या. 

यावेळी रेल्वेच्या पुणे - दौंड विभागाला उप नगरीय रेल्वेचा दर्जा देण्यासह महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एमआरआयडीसी) मुख्यालय पुण्यात स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. पाच दशकांपासून रेंगाळलेला दौंड रेल्वे स्थानकालगतच्या झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली. पाटस (ता. दौंड) रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाची उभारणी करणे आणि पुणे - दौंड लोहमार्गावर सहजपूर व कासुर्डी ही नवी रेल्वे स्थानके सुरू करण्याची मागणी करण्यात आली. दौंड सह बारामती लोकसभा मतदारसंघातील रेल्वे संबंधी मागण्या या वेळी मांडण्यात आल्या. 

खासदार सुप्रिया सुळे यांच्या दौंड संबंधी मागण्या.

- दौंड येथे रेल्वे कडून सीबीएसई पॅटर्नचे केंद्रीय विद्यालय सुरू करणे. 
- दौंड येथे शिर्डी, पंढरपूर व सिध्दटेक कडे जाणार्या भाविकांसाठी विश्रांतीगृह उभारणे.
- फलाट क्रमांक ५ व ६ च्या विस्तारीत पुलावर सरकता जिना (एस्कलेटर) बसविणे.
- फलाट क्रमांक ५ व ६ वर सर्वसाधारण आणि वातानुकूलित प्रतिक्षालये उभारणे.
- रेल्वे स्थानक लगतच्या मोकळ्या जागेचा वाणिज्य कारणांसाठी वापर करणे.
- नगर मोरी ते सिध्दार्थनगर दरम्यान रेल्वेच्या जागेत उद्यान तयार करणे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We will take positive action for the locals running through daund -lonavla