
पुणे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भोर व सुपे (ता. बारामती) येथील संबंधित प्रशासनाने काही बदल केले आहेत. त्यानुसार भोर येथे दर मंगळवारी भरविण्यात येत असलेला आठवडे बाजार हा रामबाग नाक्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरविण्यात येणार आहे. तर, सुपे येथील बुधवारी भरणारा आठवडे बाजार अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
भोर : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भोर नगरपालिका प्रशासनाने दर मंगळवारी भरविण्यात येत असलेला आठवडे बाजार हा रामबाग नाक्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरविण्यात येणार आहे. सोमवारी (ता. ८) नगरापालिका प्रशासनाने परिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली.
भोर शहरात कोरोनाचा धोका लक्षात घेता नगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांनी सांगितले. शहरातील रस्ते आणि गर्दी पाहता आठवडे बाजाराच्या दिवशी शहरातील मुख्य मंगळवार पेठेत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होणे शक्य होणार नाही. यासाठी पुढील आदेश होईपर्यंत आठवडे बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत होणार असल्याचेही मुख्याधिका-यांनी सांगितले.
नवीन जागेत नागरिकांना सोशल डिस्टन्सचे पालन करणे शक्य राहणार आहे आणि प्रशासनालाही कारवाई करणे सोपे जाणार आहे. नगरपालिकेच्या वतीने नवीन जागेत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार असून इतर सुविधा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात येणार आहेत. पोलिस प्रशासनासोबत शहरात बाजारात विक्रीसाठी येणारे काही व्यापारी, व्यावसायिक आणि आसपासच्या खेड्यातील भाजी खरेदीसाठी येणा-या नागरिकांनी नगरपालिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. शहरातील महिलांना व नागरिकांना मात्र बाजारासाठी चालण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
सुपे : सुपे (ता. बारामती) येथील बुधवारी भरणारा आठवडे बाजार कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती ग्रामपंचायतीच्या सुत्रांनी दिली.
ग्रामसचिवालयात सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला सरपंच स्वाती हिरवे, उपसरपंच ज्योती जाधव, सदस्य मल्हारी खैरे, मुनीर डफेदार, ज्येष्ठ कार्यकर्ते संजय दरेकर, विलास धेंडे, दत्तात्रेय पन्हाळे, कामगार तलाठी दीपक साठे आदींसह काही व्यापारी उपस्थित होते.
आठवडे बाजार सुरू करण्याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या फतव्याची माहिती घेण्यात आली. त्यावर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केवळ सुपे व सुप्यापासून विभक्त झालेल्या गावातील व्यापारी व शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल बाजारतळाबाहेर विकण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, आठवडे बाजार अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी डी. जी. लोणकर यांनी दिली.
सुप्यात मार्केट यार्ड असल्याने राज्यातून व राज्याच्या बाहेरूनही व्यापारी व खरेदीदारांची वर्दळ असते. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेला येथील आठवडे बाजार प्रसिद्ध आहे. त्यामुळे पुणे, नगरहूनही अनेक व्यापारी येत असतात. खबरदारी म्हणून आठवडे बाजार बंद ठेवण्यात येत असल्याने बाहेरील विक्रेत्यांनी बाजार व इतर दिवशी माल विक्रीसाठी येऊ नये, असे आवाहन सुपे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.
सुपे परिसर अद्याप कोरोनामुक्त
सुपे हे मध्यवर्ती बाजारपेठेचे ठिकाण असून, बारामती, दौंड व पुरंदर तालुक्यातील गावातून बाजारहाटासाठी नागरिकांची नेहमी वर्दळ असते. पोलिस, आरोग्य सेवक, महसूल विभाग, ग्रामपंचायत व स्थानिक कार्यकर्त्यांनी खडा पाहारा दिला. त्यामुळे आजपर्यंत सुप्यात कोरोना संसर्ग बाधित रूग्ण आढळला नाही. बाधित शहरातून आलेल्यांची माहिती घेऊन त्यांचे विलगीकरण केले. वेळीच खबरदारी घेतल्याने सुपे परिसर अद्याप कोरोना मुक्त आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.