नववर्षाच्या स्वागतासाठी "थीम पार्टी'ला पसंती

नववर्षाच्या स्वागतासाठी "थीम पार्टी'ला पसंती

पुणे - सरत्या वर्षाला निरोप देऊन, नवीन वर्षाचे स्वागतही जल्लोषात केले जाते आणि हे दोन्ही क्षण अविस्मरणीय करण्यासाठी छानशी पार्टी केली जाते. त्याचेच नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवून 2016 ची अखेरची सायंकाळ हटके करण्याचा प्रयत्न तरुणाई करत आहे. मग त्यासाठी घरगुती पार्टीपासून मोठ्या हॉटेलमध्ये धमाल पार्टी करण्याकडे कल दिसून येत आहे. "थीम बेस पार्टी' हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही हॉटेलमध्ये वेगवेगळ्या थीमवर पार्ट्यांचे आयोजन केले आहे. नावीन्यपूर्ण थीम घेऊन तरुणाईला आकर्षित करण्यासाठी विविध सवलती आणि पॅकेजेस हॉटेलकडून देण्यात येत आहेत. इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करणारी मंडळी अशा पार्ट्यांचे नेटके संयोजन करून देतात. आपल्याला हव्या असणाऱ्या सुविधा, मेनू, बजेट यांचा विचार करून पार्टीसाठी थीमची निवड करता येते. यासाठी आयोजकांकडे अनेक पर्याय असतात. याशिवाय आपल्याला फक्त मित्रांबरोबरच पार्टी करायची आहे, की त्यामध्ये कुटुंबीयांनाही सामील करून घ्यायचेय, हे ठरवूनही थीमची निवड करता येत. काही ठिकाणी पार्टीमध्ये सिनेतारकांना बोलविण्यात आले आहे, तर काही ठिकाणी गाणी व नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. घराच्या गच्चीवर दिव्यांची रोषणाई करून मित्र आणि नातेवाइकांना मेजवानी, छोट्याशा "फॅशन शो'चे आयोजन, खाण्यासाठी फक्त चॉकलेट आणि दूध अशा भन्नाट कल्पना लढवून "थर्टीफर्स्ट'ची सायंकाळ अविस्मरणीय करण्याचा काहींचा प्रयत्न आहे.

थीम पार्टीत काय-काय ?
नववर्षाच्या स्वागतासाठी मित्रांसोबत "हाउस पार्टी', हटके थीम घेऊन पार्टी, "लेझर', "डीजे' व आतषबाजी करून पार्टी, तसेच "फॅशन शो', "कॅंडल लाइट डिनर' अशा वेगवेगळ्या पद्धतीने पार्टीचे नियोजन होत आहे. पार्टीचे आयोजन करताना इतरांपेक्षा आपली पार्टी वेगळी कशी ठरेल, यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच अलीकडे प्रचलित झालेल्या "थीम पार्टी'ला विशेष पसंती दिली जात आहे. काही जण वेस्टर्न लाइफ स्टाइलला फाटा देत पारंपरिक कौटुंबिक गेट-टुगेदरला पसंती देत आहेत.

खास "पार्टी ऍक्‍सेसरीज' उपलब्ध
थीम पार्टीसाठी "पार्टी ऍक्‍सेसरीज'चे खास कीट बाजारात उपलब्ध आहे. या कीटमध्ये "हॅप्पी न्यू ईयर' असे लिहिलेली प्लेट, ग्लास आणि दिव्यांचे डिझाइन केलेल्या टोप्या, हेअर बेल्ट आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आणि रंगीबेरंगी मुखवटे आहेत. काही बेल्ट आणि मुखवटे हे चंदेरी, सोनेरी रंगातील पक्ष्यांच्या नकली पिसांपासून बनविलेले आहेत. या प्रकारच्या मुखवट्यांना तरुणाईकडून खास मागणी आहे.

मित्रांबरोबरच पार्टी करायची आहे, की त्यामध्ये कुटुंबीयांनाही सामील करून घ्यायचे, हे ठरवून थीमची निवड करता येते. त्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. सध्या "थीम बेस पार्टी' ट्रेंड वाढत असून, त्यात प्रामुख्याने "रेड कार्पेट वॉक', "हॉलिवूड' या थीमला जास्त पसंती दिली जात आहे. यासाठी 200 हून अधिक लोकांनी बुकिंग केले आहे.
- राहुल भगत, व्यावसायिक (इव्हेंट मॅनेजमेंट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com