बारामती - सुसज्ज व अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय पूर्णत्वास येणार

मिलिंद संगई
शुक्रवार, 16 मार्च 2018

बारामती : राज्यातील सर्वात सुसज्ज व अत्याधुनिक असे वैद्यकीय महाविद्यालय येत्या सहा महिन्यात पूर्णत्वास येईल अशी माहिती सूत्रांनी दिली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हा ड्रीम प्रोजेक्ट होता. जवळपास पाचशे कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करतो आहे. 

बारामती : राज्यातील सर्वात सुसज्ज व अत्याधुनिक असे वैद्यकीय महाविद्यालय येत्या सहा महिन्यात पूर्णत्वास येईल अशी माहिती सूत्रांनी दिली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हा ड्रीम प्रोजेक्ट होता. जवळपास पाचशे कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करतो आहे. 

पाचशे खाटांचे रुग्णालय असलेले शंभर विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सन 2018 मध्ये पूर्ण करुन पुढील वर्षापासून येथे नियमित वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या दृष्टीने अजित पवार प्रयत्नशील आहेत. बारामतीतील आजवरची सर्वात मोठी इमारत या वैद्यकीय महाविद्यालयाच्या निमित्ताने उभारली गेली आहे.

सुमारे 11 लाख 84 हजार स्क्वेअर फूटांची ही इमारत होणार आहे. हरित इमारत या संकल्पनेवर आधारित या इमारतीचे बांधकाम झालेले असून पाच मजली ही भव्य व प्रशस्त इमारत आहे. 

पाचशे खाटांचे जे रुग्णालय येथे उभारले जाणार आहे ती इमारत सात मजली असून त्यात दहा मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स आहेत. पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र विभाग असतील तसेच राज्यातील सर्वात अत्याधुनिक सामग्री येथे उपलब्ध करुन दिली जाणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थाना करीता दोन तर विद्यार्थी वसतिगृहासाठी पाच इमारती बांधून तयार झालेल्या आहेत. आठशे आसनक्षमतेचे एक ऑडिटोरीयम देखील या इमारतीत तयार करण्यात आले असून कार्यक्रम व बैठकांसाठी त्याचा वापर करण्यात येणार आहे. 

या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी आवश्यक वैद्यकीय साधनसामग्री खरेदीसाठी राज्य शासनाकडे सुमारे 270 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या दृष्टीने मेडीकल कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता मिळणे सर्वात महत्वाचा भाग असतो. नोव्हेंबर 2017 मध्ये या संस्थेच्या एका पथकाने सर्व पाहणी केलेली आहे. या बाबत या पथकाने सर्वच बाबी बारकाईने तपासून आपला अहवाल सादर करण्याच्या दृष्टीने पावले उचलेली आहेत. 

वैद्यकीय महाविद्यालय व पाचशे खाटांचे रुग्णालय या सर्वच इमारती उभारताना जास्तीत जास्त उजेड कसा असेल व हवा अधिकाधिक कशी खेळती राहिल जेणेकरुन वीजेचा वापर कमीत कमी करुन पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. 

जवळपास बारा लाख स्क्वेअर फूटांच्या या अतिभव्य इमारतीच्या उभारणीनंतर बारामतीच्या वैभवात भर पडणार असून पंचक्रोशीतील लोकांना सर्वप्रकारच्या आरोग्य सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजित पवार सातत्याने त्याचा पाठपुरावा करीत आहेत.

Web Title: A well-equipped medical college will be completed in baramati