नांदेड सिटी येथे होणार सुसज्ज पोलिस ठाणे; जागेची झाली पाहणी

निलेश बोरुडे
Saturday, 23 January 2021

मागील काही दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रात असलेली नांदेड, किरकटवाडी, खडकवासला व नांदोशी-सणसनगर ही चार गावे पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समाविष्ट करून घेण्याबाबत हालचाली सुरू आहेत.

किरकटवाडी: पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातून विभक्त होऊन पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समाविष्ट होत असलेल्या नांदेड,किरकटवाडी, खडकवासला आणि नांदोशी-सणसनगर या गावांसाठी नांदेड सिटी येथे भव्य पोलीस ठाणे उभारण्यात येणार असून त्यासाठी प्रस्तावित जागेची  पाहणी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केली. 

मागील काही दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रात असलेली नांदेड, किरकटवाडी, खडकवासला व नांदोशी-सणसनगर ही चार गावे पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समाविष्ट करून घेण्याबाबत हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून त्याबाबत परिपत्रकही जारी करण्यात आलेले आहे. नव्याने तयार होत असलेल्या नांदेड सिटी पोलीस ठाण्यात या चार गावांसह सिंहगड रोड  पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धायरीचा भाग जोडण्याबातही विचार सुरू असून प्रस्तावित हद्दीचा आराखडा तयार करण्याचे काम झोन तीन च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड आणि मुख्यालय पोलीस उपायुक्त स्नेहा गोरे यांच्याकडून युद्ध पातळीवर सुरू आहे.
आणखी वाचा - छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा इतिहास संकुचित ठेवणार का? 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नांदेड सिटी प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांच्याकडून पोलीस ठाण्याच्या प्रस्तावीत जागेबरोबरच परिसराची माहिती जाणून घेतली. यावेळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड,स्वप्ना गोरे, पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, नंदकिशोर शेळके, प्रमोद वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, दिपक खेडकर, नांदेड सिटी प्रशासन उपप्रमुख मनोज शर्मा,मोजणी विभागाचे उपप्रमुख अवधुत घोगले, सुरक्षा सहाय्यक विठ्ठल जाधव तसेच सिंहगड रोड पोलीस ठाणे व सिंहगड रोड वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

"99 वर्षांच्या कराराने सदरची सुमारे 18 हजार चौरस फूट जागा पोलीस ठाण्यासाठी देण्यात येणार आहे. टाऊनशिप नियोजनामध्ये पोलीस ठाणे बांधून देण्याची जबाबदारी संबंधीतांकडे असते त्यानुसार सुसज्ज पोलीस ठाणे नांदेड सिटी प्राधीकरणाकडून बांधून देण्यात येणार आहे."
-  सतीश मगर, व्यवस्थापकीय संचालक, नांदेड सिटी.

"शासनाकडून सदर पोलीस ठाण्यासाठी तत्वत: मंजुरी मिळाली आहे.लवकरच प्रशासकीय बाबींची पूर्तता करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.सदरची जागा पोलीस ठाण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि मध्यवर्ती ठिकाणी आहे. परिसरातील नागरिकांना तातडीने आणि चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मिळून 120 च्या आसपास स्टाफ या प्रस्तावीत पोलीस ठाण्यात तैनात असेल."
- अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर. 

 

आणखी वाचा - शनिवार वाड्याचा दिल्ली दरवाजा उघडला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A well equipped police station will be set up at Nanded City