विहिरीत पाणी; पण पिके सुकली

विहीरीत असणारा पाणीपुरवठा
विहीरीत असणारा पाणीपुरवठा

सोमेश्वरनगर - नीरा डाव्या कालव्यालगतच्या पंपांचे वीजजोड गेल्या बारा दिवसांपासून तोडलेले आहेत. कालव्यातील पाण्याची चोरी होऊ नये, यासाठी ही कारवाई केली आहे. मात्र, त्यामुळे पिकांच्या बाबतीत ऐन हिवाळ्यात उन्हाळा झाला आहे. विहिरीत पाणी आहे; पण विजेअभावी उपसता येत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. यामुळे उभा ऊस सुकू लागला असून, गहू, हरभरा, मका, कडवळ ही पिकेही जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.

नीरा डाव्या कालव्याला १५ डिसेंबरला पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. कालव्याद्वारे पुरंदर- बारामती ओलांडून इंदापूर तालुक्‍यातील शेटफळगढे परिसरातील तलाव भरण्यासाठी पाटबंधारे विभाग प्रयत्न करत आहे. पाणीचोरी रोखण्यासाठी प्रशासनाने सरसकट वीजजोड तोडण्याची मोहीम हाती घेतली. महसूल विभागाच्या आदेशाने १५ डिसेंबरलाच जेऊर- मांडकी या पुरंदर तालुक्‍यातील गावांपासून बारामतीपर्यंत नीरा डाव्या कालव्यालगतच्या ट्रान्स्फॉर्मरचे वीजजोड तोडण्यात आले. यामुळे पुरंदर, बारामती व इंदापूरच्या काही भागांतील कालव्यालगतचे सर्व शेतीपंप, उपसा सिंचन योजना बंद आहेत. काही गावांची पिण्याच्या पाणी योजनांची वीजही सुरवातीला तोडण्यात आली होती. शेतीचे वीजपंप चार- सहा दिवसांनी चालू होतील, अशी अटकळ शेतकऱ्यांनी बांधली होती. नंतर दहा दिवसांनी वीज जोडली जाणार, अशी चर्चा होती. मात्र दहा दिवसांनंतरही कृषी पंपांचे वीजजोड जोडले जात नसल्याचे पाहून शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे. कालव्याशेजारील विहीर असणारे सर्वच शेतकरी पाणीचोर नाहीत.

विहिरींच्या आधारेच ते बारमाही शेती करतात. विहिरी भरलेल्या असतानाही विजेअभावी पाणी उपसता येत नाही आणि डोळ्यांपुढे पिके करपून चालली आहेत, असे चित्र गावागावांत दिसत आहे. उसाच्या तोडणीपूर्वी शेताला पाणी द्यावे लागते; परंतु पाण्याशिवाय वाळलेला ऊस तोडून द्यावा लागत आहे.

पुढील आदेश आल्यानंतरच वीज जोडणार
वीज कंपनीच्या सोमेश्वरनगर उपविभागाचे अधिकारी सचिन म्हेत्रे यांनी सांगितले, की महसूल विभागाच्या आदेशानुसार १५ डिसेंबरपासून शेतकऱ्यांचे वीजजोड तोडण्यात आले आहेत. आता पुढील आदेश आल्यानंतरच कार्यवाही करता येईल. पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी अजित जगदाळे म्हणाले, ‘‘इंदापूरला तीन महिन्यांपासून पाणी नाही. शेटफळपर्यंतच्या उपसा योजना बंद ठेवल्या आहेत. ही बाब धोरणात्मक आहे. तलाव भरतील आणि पाण्याचे शेती आवर्तन सुरू होईल तेव्हा वीजजोड जोडले जातील.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com