पश्चिम बंगालच्या विरोधकांची नवी समीकरणे

पश्चिम बंगालच्या विरोधकांची नवी समीकरणे
Published on

पश्चिम बंगालच्या विरोधकांची नवी समीकरणे

नंदीग्राममध्ये काँग्रेसला ममतांचा पाठिंबा; ‘इंडिया’ला बळकट करण्याचा दावा

कोलकत्ता, ता. २० (पीटीआय) : नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या गटाच्या उमेदवार संचिता प्रधान डे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर बॅनर्जी यांनी हा निर्णय घेतला. काँग्रेसला ‘भगिनी पक्ष’ आणि ‘नैसर्गिक सहकारी’ संबोधत हा निर्णय देशाच्या व्यापक हितासाठी आणि ‘इंडिया’ आघाडीला मजबूत करण्यासाठी घेतल्याचे त्यांनी सांगितले.

बॅनर्जी यांच्या गटाने सुरुवातीला नंदीग्राममध्ये स्वतंत्र उमेदवार दिला होता. मात्र, संचिता प्रधान डे यांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर माघार घेतली. त्यानंतर काँग्रेसला पाठिंबा देण्यात आला. त्यामुळे भाजपविरोधी मतांचे विभाजन टाळण्याच्या दृष्टीने या निर्णयाकडे पाहिले जात आहे, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पक्षाचे पारंपरिक नाव आणि पक्षचिन्ह तात्पुरते गोठवले असून, दोन्ही गटांना स्वतंत्र नावे आणि चिन्हे दिली आहेत. ममता बॅनर्जी यांच्या गटाला ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘फुटबॉलपटू’ चिन्ह देण्यात आले आहे.

काँग्रेससोबतचा जुना संघर्ष

ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून १९९०च्या दशकाच्या अखेरीस तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. मात्र, भाजप आणि डाव्या आघाडीविरोधातील राजकारणात दोन्ही पक्ष यापूर्वीही एकत्र आले आहेत. २००१च्या विधानसभा आणि २००९च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी आघाडी केली. २०११मध्ये काँग्रेस-तृणमूल आघाडीने बंगालमधील डाव्या आघाडीची ३४ वर्षांची सत्ता संपवली. मात्र, धोरणे, जागावाटप आणि राज्यातील राजकीय वर्चस्वावरून मतभेद वाढल्यानंतर ही आघाडी संपुष्टात आली. ममता बॅनर्जी यांच्या १५ वर्षांच्या सत्ताकाळात दोन्ही पक्षांतील संबंध अधिक तणावपूर्ण झाले. काँग्रेसने तृणमूलवर आपल्या संघटनेला कमकुवत केल्याचा आरोप केला, तर तृणमूलने काँग्रेसला प्रभावहीन ठरवले.

काँग्रेसची सावध प्रतिक्रिया

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीररंजन चौधरी यांनी ममतांच्या निर्णयाला लगेच राजकीय जवळीकीचे स्वरूप देण्याचे टाळले. काँग्रेसला केवळ गरजेपुरता पाठिंबा न देता तिच्या संघटनात्मक बळाची दखल घ्यावी, असे ते म्हणाले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष शुभंकर सरकार यांनी मात्र या पाठिंब्याचे स्वागत केले. या घडामोडीमुळे बंगालमध्ये विरोधकांच्या एकजुटीसाठी नवा मार्ग खुला होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले.

मिलन प्रधान यांच्या अटकेने वाद

ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर काही तासांतच काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना २००७ च्या नंदीग्राम जमीन अधिग्रहणविरोधी आंदोलनाशी संबंधित जुन्या प्रकरणात अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या न्यायालयीन वॉरंटच्या आधारे ही कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना ३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या गटाने या कारवाईला राजकीय सूड असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी काँग्रेस-तृणमूल संभाव्य आघाडीची खिल्ली उडवत दोन्ही पक्ष राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष करत असल्याचा दावा केला.

ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला ‘नैसर्गिक सहकारी’ संबोधल्याने ‘इंडिया’ आघाडीतील समन्वयाच्या चर्चेला पुन्हा चालना मिळाली आहे. मात्र, बंगालमधील दोन्ही पक्षांतील दीर्घकाळचा संघर्ष आणि परस्पर अविश्वासाच्या पार्श्वभूमीवर नंदीग्राममधील ही जवळीक पोटनिवडणुकीपुरती मर्यादित राहते की व्यापक सहकार्याचा मार्ग मोकळा करते, हे आगामी घडामोडींवर अवलंबून असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com