"डीएमयू'ला मुहूर्त कधी? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

पुणे - पुणे- दौंड मार्गावर डीएमयूच्या (डिझेल मल्टिपल युनिट) माध्यमातून उपनगरीय (लोकल) प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. तीन डीएमयू गाड्या दाखल होऊन अडीच महिने झाले तरीही उद्‌घाटनासाठी नेतेमंडळींच्या प्रतीक्षेमुळे या गाड्यांना हिरवा कंदील कधी दाखविणार, असा प्रश्‍न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. 

पुणे - पुणे- दौंड मार्गावर डीएमयूच्या (डिझेल मल्टिपल युनिट) माध्यमातून उपनगरीय (लोकल) प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. तीन डीएमयू गाड्या दाखल होऊन अडीच महिने झाले तरीही उद्‌घाटनासाठी नेतेमंडळींच्या प्रतीक्षेमुळे या गाड्यांना हिरवा कंदील कधी दाखविणार, असा प्रश्‍न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. 

पुणे-दौंड मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम गेल्या वर्षी पूर्ण झाले; परंतु काही कामे अद्याप पूर्ण झाली नसल्याने या मार्गावर सद्यःस्थितीत ईएमयूद्वारे (इलेक्‍ट्रिकल मल्टिपल युनिट) उपनगरीय सेवा सुरू करणे शक्‍य नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे प्रशासनाने अन्य मार्गांचा पर्याय अवलंबण्याचा निर्णय घेतला होता. त्यास मान्यता देत रेल्वे बोर्डानेही प्रशासनाला डीएमयू गाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जानेवारीपासून आतापर्यंत तीन 

डीएमयू गाड्या बोर्डाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या गाडीची पुणे-दौंड मार्गावर दोन वेळा यशस्वी चाचणीदेखील झाली. त्यानंतर गेल्या महिन्यात आणखी एक डीएमयू रेल्वे दाखल झाली; परंतु गाड्यांना दहाच डबे आहेत. लवकरच डीएमयू प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली होती. मात्र, महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेचा अडसर असल्याचे कारण देण्यात आले. आता अचारसंहिता संपल्यानंतर तरी ही गाडी धावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र अद्याप रेल्वे प्रशासनाकडून त्याबाबतची कोणतीही घोषणा झालेली नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची वेळ मिळत नसल्यामुळे ही गाडी जागेवरच उभी असल्याचे समजते. वास्तविक येत्या 19 मार्च रोजी प्रभू मुंबईत येत आहेत. मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या पुण्यात मात्र ते येणार नाहीत, त्यामुळे ही संधीदेखील हुकणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले दिसत नाहीत. त्यामुळे यावेळीही या गाडीला हिरवा कंदील मिळत नसल्याचे बोलले जात आहे. 

डीएमयू तातडीने सुरू कराव्यात - शहा 
गेल्या दोन महिन्यांपासून या डीएमयू गाड्या तशाच उभ्या आहेत, त्यामुळे रेल्वे प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, त्याला जबाबदार कोण? मंत्र्यांची वेळ मिळत नाही म्हणून प्रवाशांची गैरसोय करण्यात काय अर्थ आहे, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा यांनी केली. 

Web Title: when start DMU