esakal | पुणे विद्यापीठ चौकातील कोंडी कधी संपणार?
sakal

बोलून बातमी शोधा

University Chowk Traffic

पुणे विद्यापीठ चौकातील कोंडी कधी संपणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - हिंजवडी ते शिवाजीनगर या दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडून एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, अद्याप या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवातही न झाल्याने सेनापती बापट रस्ता आणि गणेश खिंड रस्त्यावरील वाहतुकीला मोठा फटका बसत आहे. गर्दीच्या वेळेत या चौकात एक किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी अर्धा अर्धा तास लागत असल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. त्यासाठी पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचा अडथळा ठरत असल्याने तो पाडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, त्या ठिकाणी दुमजली उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन केले. गेल्यावर्षी लॉकडाउनच्या काळात हा उड्डाणपूल पाडला. त्यास या महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले. या कालावधीत नियोजित उड्डाणपुलाचे काम सुरू होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात या कामाला सुरवात झाली नाही. त्याचा फटका वाहतुकीला बसत आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेस या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी नित्यनियमाचीच झाली आहे

पुणे विद्यापीठ चौकातील नियोजित उड्डाणपुलासाठी विविध शासकीय परवानग्या घेण्यास कालावधी गेला. आता त्या परवानग्या मिळाल्या आहेत. या महिनाअखेरपर्यंत पुलाचे काम सुरू करणार आहे. या कालावधीत पर्यायी रस्त्यांचा आराखडा तयार केला आहे, जेणेकरून या चौकातील वाहतूक कोंडी होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे.

- सुहास दिवसे, आयुक्त, पीएमआरडीए

हेही वाचा: पुणे : आर्यन खानसोबत सेल्फी घेणारा के. पी. गोसावी फरार आरोपी

आणखी दोन वर्षे त्रास

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या मार्गावर मेट्रो प्रकल्प आणि पुणे विद्यापीठ चौकातील नियोजित उड्डाणपुलाच्या कामास या महिनाअखेरपर्यंत सुरुवात होणार आहे. या कामाची मुदत तीन वर्षे आहे. हे काम सुरू झाल्यानंतर या चौकातील वाहतूक कोंडीत आणखी भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या परिसरातून ये-जा करणाऱ्यांना आणखी दीड ते दोन वर्षे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. काम सुरू झाल्यानंतर या चौकात होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्त्यांचा विचार करण्यात आला आहे, असे ‘पीएमआरडीए’कडून सांगण्यात आले.

चार लाख वाहनांची दररोज ये-जा

पुणे विद्यापीठ चौकात पाषाण, बाणेर, पिंपरी-चिंचवड येथून; तर सेनापती बापट आणि गणेशखिंड रस्ता अशी चहूबाजूने वाहतूक येते. दररोज या चौकातून सुमारे तीन ते चार लाख वाहने जातात. गर्दीच्या वेळेस वाहतुकीची कोंडी होते. त्यातून वादावादीचे प्रकारही घडतात. त्याचा त्रास या भागातून दररोज जाणाऱ्या वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. ही वाहतूक कोंडी कधी फुटणार, असा प्रश्‍न चालकांकडून उपस्थित केला जात आहे.

विद्यापीठ चौकात काय होणार?

  • पुणे विद्यापीठ ते ई-स्क्वेअरपर्यंत सव्वा किलोमीटर लांबीचा दुमजली उड्डाणपूल

  • दुसऱ्या स्तरावर मेट्रोसाठी स्वतंत्र मार्गिका

  • बाणेरकडे जाण्यासाठी दुपदरी रॅम्प

  • सेनापती बापट रस्त्यावर उड्डाणपुलावर जाण्यासाठीचा रॅम्प

  • पाषाणकडे जाण्यासाठी दुपदरी रॅम्प

  • बाणेरकडून शिवाजीनगरकडे, तसेच शिवाजीनगरकडून बाणेरला जाण्यासाठी दुपदरी भुयारी मार्ग

  • शासकीय तंत्रनिकेतन आवाराच्या समोरील बाजूस शिवाजीनगर ते औंध उड्डाणपुलावर जाण्यासाठी रॅम्प

  • हरेकृष्ण मंदिर पथावर भुयारी मार्ग

  • सिमला ऑफिस चौकात ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल

  • बाणेर रस्त्यावर अभिमान श्री चौकात भुयारी मार्ग

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी आणि त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या अडचणींबाबत आपल्या नावासह खालील क्रमांकावार प्रतिक्रिया पाठवा.

84849 73602

loading image
go to top