esakal | ''जावडेकरजी, कुठे आहेत १,१२१ व्हेंटिलेटर्स ?''

बोलून बातमी शोधा

prakash javadekar
''जावडेकरजी, कुठे आहेत १,१२१ व्हेंटिलेटर्स ?''
sakal_logo
By
टीम सकाळ

पुणे : ''कोविडग्रस्त पुण्याला केंद्र सरकारकडून व्हेंटिलेटर्स पुरविले जातील'', अशी घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चौदा दिवसांपूर्वी केली. परंतु, अद्यापही पुण्याला व्हेंटिलेटर्स मिळालेले नाहीत. दिवसेंदिवस येथे रुग्ण वाढत असताना ही दिरंगाई अक्षम्य आहे, केंद्र सरकारकडून हे व्हेंटिलेटर्स मिळणार कधी?''असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी केला आहे.

पुणे शहरातील कोरोनाची स्थिती चिंताजनक होत असताना भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांचे पुण्याकडे दुर्लक्ष होत आहे अशी टीका सर्वत्र होऊ लागल्याने त्यावर मलमपट्टी करण्यासाठी केंद्रीय मंत्री जावडेकर नऊ एप्रिल रोजी पुण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीत त्यांनी भाग घेतला आणि येत्या तीन दिवसांत केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला १,१२१ व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात येतील तसेच कोरोना प्रतिबंधासाठी लसीचे विशेष डोस पुरविले जातील. अशा घोषणा केल्या. महाराष्ट्राला केंद्र सरकारचे सर्वतोपरी सहकार्य राहील असेही त्यावेळी ते म्हणाले होते. परंतु, गेल्या चौदा दिवसांतील पुण्यातील आकडेवारी पाहिली तर, रुग्णांची संख्या अधिकच वाढलेली आहे. गंभीर स्थितीतील रुग्णांच्या नातेवाईकांना व्हेंटिलेटरसाठी शोधाशोध करत फिरावे लागत आहे. प्रशासनाचीही तारांबळ उडत आहे. जावडेकरजी तुम्ही जाहीर केलेली १,१२१ व्हेंटिलेटर्सची मदत कधी मिळणार याची पुणेकर वाट बघत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: पुण्यात 32 कंपन्यांना हवे कामाच्या ठिकाणी लसीकरण

हेही वाचा: ऑक्सिजनचा न्याय्य वापर करा; वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

पुण्यातील कोरोना साथीची व्यापकता पाहता प्रतिबंधक लस देणे आवश्यकच आहे. पंतप्रधानांनी त्याकरीता लसोत्सव जाहीर केला. पण, पुण्यात पहिला डोस, दुसरा डोस यासाठी लोकांची धावाधाव चालू आहे. सर्वत्र लसीचा तुटवडा आहे. जावडेकर यांनी जाहीर केलेला विशेष लसीचा कोटा पुण्याला कधी मिळणार? असेही जोशी यांनी म्हटले आहे.

राजीनामे द्या आणि बंगालमध्ये प्रचार करा

पश्चिम बंगालमध्ये मोदींसह भाजपचा सर्व ताफा प्रचारात गुंतलेला आहे. त्यात पुण्यातील दोन आमदार सुनील कांबळे आणि सिद्धार्थ शिरोळे तसेच भाजपचे काही नगरसेवक आणि काही पदाधिकारी यांचाही समावेश आहे. पुण्यात साथ थैमान घालत असताना आमदार, नगरसेवक ज्या मतदारांनी भाजपवर विश्वास ठेवला, त्या मतदारांना वाऱ्यावर सोडून मोदी निष्ठा दाखवत बंगालमधील प्रचारात फिरत आहेत. त्यांनी बंगालमध्ये पक्षाचा प्रचार करत फिरावे पण, त्या अगोदर आमदारकी आणि नगरसेवकपदाचे राजीनामे द्यावेत अशी मागणी मोहन जोशी यांनी पत्रकात केली आहे.