मालिश व्यवसायाला घरघर; पुण्यातील कारागिरांना खंत | Massage | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Massage
मालिश व्यवसायाला घरघर; पुण्यातील कारागिरांना खंत

मालिश व्यवसायाला घरघर; पुण्यातील कारागिरांना खंत

स्वारगेट - शहराच्या मध्यवर्ती भागात रात्रीचे नऊ वाजले की, लक्ष्मी रस्त्याच्या दुकानाच्या पायऱ्यांवर खांद्यावर लाल रुमाल टाकून मालिश करणारे कारागीर दिसतात. या कारागिरांची संख्या एकेकाळी मोठी होती. परंतु, ती आता कमी होऊ लागली असली, तरी अजूनही निष्ठेने त्यांचा व्यवसाय सुरू आहे. त्यांची नवी पिढी आता या व्यवसायाकडे वळण्यास नाखूष असून ते शिक्षण घेत असल्यामुळे आमची या व्यवसायातील ही शेवटचीच पिढी असल्याचे या कारागिरांनी सांगितले.

शहराच्या मध्यवर्ती भागातील विशेषतः व्यापारी पेठांत हे व्यावसायिक रात्री दिसतात. हे मूळचे तेलंगणामधील. त्यांची संख्या शंभरपेक्षा जास्त आहे. ‘‘आमचे वडीलही हा मालिश करण्याचा व्यवसाय करत होते. वीस वर्षांपूर्वी मी देखील या व्यवसायात आलो’’, असे शिवा पवार यांनी सांगितले.

मालिश ही आमची पारंपरिक कला आहे. विज्ञान, तंत्रज्ञानामुळे मालिश करण्याची आधुनिक साधने बाजारपेठेत आली असतानाही ग्राहक पारंपरिक मालिश करण्याच्या कलेलाच पसंती देत आहेत. ही कला आम्ही वडीलधाऱ्या लोकांकडून पारंपरिक पद्धतीने शिकलो आहोत. सरावाने आम्ही या कलेत पारंगत झाल्याचे या कारागिरांनी सांगितले.

एका रात्रीत चार-पाच ग्राहकांची मालिश करतो. वर्षानुवर्षे जोडलेले काही ग्राहक आम्हाला त्यांच्या घरीच बोलावून मालिश करून घेतात. त्याचे आम्ही ८०० ते १००० रुपये घेतो. आम्ही वर्षातील सहा महिने येथे व सहा महिने गावी (तेलंगणा) राहतो. काही वेळेस पोलिस आम्हाला चौकशी करण्याच्या बहाण्याने ताब्यात घेतात. तेव्हा व्यवसाय बंद करावा लागतो, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: अटलबिहारी वाजपेयी इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकांचे निलंबन चुकीचे

वर्षातून चार महिने मी पुण्यात असतो. गणपतीमध्ये आमचा सीझन असतो. या काळात गर्दी असल्याने ग्राहकांची संख्या मोठी असते. रात्रभर ग्राहकांना मालिशची सेवा देतो. काही वेळा पोलिसांचा त्रासही सहन करावा लागतो.

- विजू राठोड, मालिश कारागीर

कोरोनाच्या काळात आम्हाला प्रचंड त्रास झाला. लॉकडाउन झाल्यानंतर वाहने चालू नसल्याने आम्ही काही लोक गावाकडे चालत गेलो. गेल्या वीस वर्षांपासून मी हा व्यवसाय करीत आहे. मालिश करण्याची हातोटी असल्याने ग्राहक आमच्याकडे आवर्जून येतात.

- सुरेश पवार, मालिश कारागीर

पारंपरिक मालिश पसंती

  • दिवसभर दुकानात बसणारे व्यापारी, तालीम व जिममध्ये जाणारे तरुण, मणका किंवा गुडघ्यांचा त्रास असणारे ज्येष्ठ वर्ग मालिश कारागिरांचा ग्राहक

  • शिरा मोकळ्या होतात. रक्ताभिसरण चांगले होऊन झोप शांत लागत असल्याने नागरिकांची पारंपरिक मालिशला पसंती

प्रतिव्यक्ती मालिशचा दर - १५० ते २०० रुपये

घरपोच सेवा - ८०० ते १००० रुपये

loading image
go to top