esakal | कोण आहेत अण्णा बनसोडे? का होता त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा पहारा
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवड स्टेशन - अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयासमोरील बंदोबस्त.

पहारा व बंदोबस्त
राज्यातील सत्तानाट्याच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी बनसोडे यांचे कार्यालय व निवासस्थानी भेट दिली. दोन्ही ठिकाणी कुलूप लावलेले होते व पोलिस बंदोबस्त होता. चार-पाच तरुणांचा पहारा होता. येणाऱ्या-जाणाऱ्यांची ते चौकशी करत होते. ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी बनसोडे यांच्या घरी जायचे म्हटल्यावर, ‘जाऊ नका, अण्णा घरी नाहीत. त्यांनी स्पष्ट सांगितलंय, घरी कुणाला सोडू नका,’ असे उत्तर कार्यकर्त्यांनी दिले. ‘आम्हाला फक्त घर बघायचं,’ या बोलीवर कार्यकर्ते बनसोडे यांच्या निवासस्थानापर्यंत आले. घर बंद असल्याचे पाहून माघारी परतलो.

कोण आहेत अण्णा बनसोडे? का होता त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा पहारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - राज्यात सत्तानाट्याचे पडसाद शहरात उमटू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले व मंगळवारी (ता. २६) राजीनामा दिलेले अजित पवार यांचे समर्थक पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे नॉट रिचेबल आहेत. त्यांचे कुटुंबीयही घरी नाही. मात्र, चिंचवड स्टेशन येथील निवासस्थान आणि जनसंपर्क कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त आहे. कार्यकर्त्यांचा खडा पहारा आहे. दरम्यान, महापालिका व शहराच्या राजकारणातही ‘कोण कोणाचे समर्थक’ यावर चर्चा सुरू आहे.

महाविकासआघाडीची उजडली 'पहाट'; आमदारांचे शपथविधी सुरु

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाला साथ देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि शहरातील राजकारणात चर्चा व तर्कवितर्कांना उधाण आले. पवार यांच्या सोबत केवळ पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे राहिले आणि त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. कोण आहेत बनसोडे, अशी विचारणा होऊ लागली. याचा मागोवा घेतला तेव्हा कळले, एका सर्वसामान्य कुटुंबातील पानटपरीचालक व्यक्‍तीने नगरसेवकापासून आमदारकीपर्यंतचा प्रवास केला आहे.

मी राष्ट्रवादीतच होतो, आहे आणि असेन - अजित पवार

कोण आहेत बनसोडे? 
हवेली विधानसभा मतदारसंघाचे विभाजन करून २००८ मध्ये पिंपरी मतदारसंघ अस्तित्वात आला. अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव. २००९ च्या निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ने अण्णा दादू बनसोडे यांना उमेदवारी दिली आणि ते निवडून आले. २०१४ ला पराभूत झाले. २०१९ ला ‘आपला कामाचा माणूस’ असा प्रचार करीत पुन्हा आमदार झाले. पक्ष तोच राष्ट्रवादी काँग्रेस. तीन वेळा ते नगरसेवक होते. वेगवेगळ्या वॉर्डांचे प्रतिनिधित्व त्यांनी महापालिकेत केले आहे. स्थायी समिती सदस्य व अध्यक्षपदही भूषविले आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्यांची पानटपरी होती. आता याच टपरीच्या वर त्यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. तेथून जवळच निवासस्थान आहे. 

उमेदवारी नाट्य
२०१९ ची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि बनसोडे यांनी ‘राष्ट्रवादी’कडे उमेदवारी मागितली. पक्षाने ती नाकारली. त्यामुळे बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल करण्याचे त्यांनी जाहीर केले. त्या वेळी, ‘अजित पवार यांनी स्वतः एबी फार्म दिला तरी, मी उमेदवारी घेणार नाही, असे लिहून देतो,’ असे छातीठोकपणे त्यांनी पत्रकारांना सांगितले होते. शिवाय, पक्षातील एकाधिकारशाही आणि स्थानिक नेतृत्व मोठे होऊ न देणे आदी कारणांमुळे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामाही दिला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी अर्ज सादर करताना अजित पवार यांनी बनसोडे यांच्या नावाचा एबी फॉर्म पाठवला. बनसोडे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले आणि पवार यांचे खंदे समर्थक बनले. 

पदाधिकाऱ्यांचे मोघम उत्तर
शहर राष्ट्रवादीमध्येही कोण कोणासोबत, अशी चर्चा रंगली आहे. काहींनी अजित पवार तर काहींनी ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांच्या समर्थनाचे फलक लावले आहेत. नव्या व मधल्या फळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक ‘आम्ही दादांसोबत’ असे मोघमपणे खासगीत उत्तर देत आहेत.

कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांकडून नियोजन
सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कायदा-सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बंदोबस्ताचे दोन प्लॅन तयार केले आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिली. 

राज्यात सर्वत्रच राजकीय घडामोडींमुळे वातावरण ढवळून निघाले आहे. नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही उत्सुकता आहे. मात्र, यात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनीही खबरदारी घेतली आहे. शहरात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या राजकीय पक्षांचा चांगला प्रभाव आहे. येथील तीनही आमदार वेगवेगळ्या पक्षाशी संबंधित आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींचे पडसाद शहरातही उमटत आहेत. सत्ता कोणाची येणार, यावर शहरातील राजकारणाचीही गणिते अवलंबून आहेत. प्रमुख पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचे घर व कार्यालयाजवळ बंदोबस्त ठेवण्यासह कार्यकर्त्यांच्या हालचालींवरही लक्ष ठेवले जात आहे. महत्त्वाच्या ठिकाणीही बंदोबस्त तैनात केला असून, यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्याही रद्द केल्याचे बिष्णोई यांनी स्पष्ट केले.

loading image