esakal | अमित शहा, फडणवीस पुण्यातून कोणाला देणार मंत्रीपदाची संधी?
sakal

बोलून बातमी शोधा

3Amit_Shah_CM_Devendra_Fadnavis

हर जिल्हा आणि पिंपरीतील नऊ आमदारांच्या बळावर राज्यात सत्तारूढ होणाऱ्या भारतीय जनता पक्ष- शिवसेना युतीच्या सरकारमध्ये पुण्यातील किती जणांना मंत्रिपदाची संधी मिळणार, या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.

अमित शहा, फडणवीस पुण्यातून कोणाला देणार मंत्रीपदाची संधी?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे ः शहर जिल्हा आणि पिंपरीतील नऊ आमदारांच्या बळावर राज्यात सत्तारूढ होणाऱ्या भारतीय जनता पक्ष- शिवसेना युतीच्या सरकारमध्ये पुण्यातील किती जणांना मंत्रिपदाची संधी मिळणार, या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे शहरात मेट्रो, आंतरराष्ट्रीय विमानतळ, "जायका', रिंग रोड आदी महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू असताना मंत्रिमंडळात पुण्याला पुरेसे प्रतिनिधीत्त्व मिळाले तर ते वेगाने मार्गी लागू शकतील.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोथरूडमधून निवडून आले असून सध्या क्रमांक दोनचे ते मंत्री असल्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्‍चित समजला जात आहे. तर, पर्वतीमधून तीन वेळा व यंदा शहरातून सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांचाही मंत्रिपदावर दावा आहे. विधानसभेच्या सरत्या कार्यकाळात त्यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश हुकला होता. त्याचप्रमाणे यंदा टिळक जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे पहिल्यांदाच निवडून आलेल्या मुक्ता टिळक यांनाही त्यानिमित्ताने संधी मिळू शकते, असा अंदाज भाजपच्या गोटातून वर्तविण्यात येत आहे.

जिल्ह्यातून भाजपचे एकमेव आमदार या नात्याने राहुल कूल आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचाही यांच्यासोबत महेश लांडगे यांचाही विचार होऊ शकतो. मंत्रिमंडळाच्या या पूर्वीच्या विस्तारातही जगताप आणि लांडगे यांचे नाव चर्चेत होते. लोकसभा निवडणुकीतपूर्वी श्रीरंग बारणे यांना मदत करण्याच्या अटीवर जगताप यांनी काय कबूल करून घेतले होते ते यावेळी नक्की समजेल. तसचे भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे हे सुद्धा स्पर्धेत असून या दोघांपैकी नेमकी कोणाला लॉटरी लागणर हे लवकरच कळेल. राहुल कुल यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दौंडमध्ये सभा घेतल्यावर तुम्ही मला आमदार द्या मी तुम्हाला मंत्री देतो असे आश्वासन जनतेला दिले होते, त्या आश्वासनाचेही काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

भाजपच्या प्रदेश स्तरावरील प्रतिनिधीशी याबाबक चर्चा केली असता, मंत्रिमंडळात पुण्याला प्रतिनिधीत्त्व शंभर टक्के मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच मंत्रिमंडळ रचनेबाबत शिवसेनेबरोबर सध्या चर्चा सुरू आहे. त्या बाबत अंतिम निर्णय झाल्यावर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच विस्तारामध्ये पुण्याला नक्की स्थान मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.