Corona Updates: चार टप्प्यात होणार लसीकरण; पहिल्या टप्प्यात 'यांचा' समावेश

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 24 November 2020

कोवीड-१९ महामारीवरील लसीकरणासाठी भारतासारख्या विशाल देशात तेवढ्या सक्षम वितरण प्रणालीचे जाळे उभे करणे सोपे नाही. त्यामुळे या कामी टपाल विभागाच्या देशभरातील नेटवर्कचीही मदत घेण्याची चाचपणी केंद्र करत आहे.

नवी दिल्ली : कोरोना लसीकरण सुरवातीला चार मुख्य टप्प्यांत करण्यात येणार आहे. डॉक्‍टर आणि आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, ६५ व ५० वर्षांपुढील नागरिक आणि गंभीर आजार असलेले नागरिक यांना पहिल्या काही टप्प्यांत लसीकरण करण्यात येणार आहे. लस उपलब्ध होताच पहिल्या टप्प्यात डॉक्‍टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह १ कोटी कोरोना वॉरियर्सचे लसीकरण करण्यात येईल. त्यासाठी केंद्रीय पातळीवर राज्यांकडून संबंधितांच्या याद्या मागविण्यात आल्या आहेत.

'प्रियांका आणि सलामत या दोघांकडे आम्ही हिंदू-मुस्लीम म्हणून पाहत नाही'

या महामारीवरील लस देशात प्रत्यक्षात कधी येणार याची माहिती कोणालाच नसली तरी लसीकरणासाठी केंद्र सरकारने वेगवान तयारी सुरू केली आहे. डॉक्‍टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह १ कोटी कोरोना योध्यांचे लसीकरण करण्यात येईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांकडून त्यांची नावे मागविली आहेत. आतापावेतो राज्यांकडून सुमारे ९२ ते ९५ टक्के सरकारी रुग्णालये व ५५ टक्के खासगी रुग्णालयांतील डॉक्‍टर, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांची नावे दिल्लीत पोहोचल्याचे सूत्रांनी सांगितले. लसीकरणासाठी तयार केलेल्या टास्क फोर्सकडे १ कोटी आरोग्य योध्यांची माहिती पोहोचली आहे. आगामी एका आठवड्यात आम्ही लसीकरणाच्या वितरण प्रक्रियेचा अंतिम आराखडा तयार करू, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

न्यूयॉर्कला जा आणि लस मिळवा मोफत; ऑफरमुळे ट्रॅव्हल कंपनी वादात​

वितरणाबाबत आढावा सुरू
कोवीड-१९ महामारीवरील लसीकरणासाठी भारतासारख्या विशाल देशात तेवढ्या सक्षम वितरण प्रणालीचे जाळे उभे करणे सोपे नाही. त्यामुळे या कामी टपाल विभागाच्या देशभरातील नेटवर्कचीही मदत घेण्याची चाचपणी केंद्र करत आहे. भारतात पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कोरोना लस उपलब्ध होईल असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नुकतेच सांगितले आहे. केंद्राने प्रस्तावित लसीच्या प्रत्यक्ष वितरणाबाबतचा नियमितपणे आढावा घेणे सुरू केले आहे. यासाठी आरोग्य मंत्रालयात खास ऍपही तयार करण्यात येत आहे. पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट व ऑक्‍सफर्डच्या लसीसह पाच लसी सध्या विकसित करण्यात येत आहेत. यातील तीन लसींच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत.

Cyclone Nivar किनारपट्टीच्या दिशेने; तामिळनाडुत उद्या सुट्टी तर पुद्दुचेरीत कलम 144 लागू​

पंतप्रधान शुक्रवारी पुण्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ आणि २८ तारखेला पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यादरम्यान ते सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांच्याशी खास चर्चा करणार आहेत. पंतप्रधान सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार की पूनावाला यांना त्यांच्या भेटीसाठी बोलावले जाणार याबाबत स्पष्ट माहिती नाही. मात्र या भेटीसाठी पुण्याच्या प्रशासनाने तयारी केली आहे.

- देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona vaccination will initially be done in four stages in India