esakal | नौशाद उस्मान यांच्या एक महिन्यापूर्वीच्या त्या पोस्टवर का होतेय टीका?
sakal

बोलून बातमी शोधा

नौशाद उस्मान यांच्या एक महिन्यापूर्वीच्या त्या पोस्टवर का होतेय टीका?

नौशाद उस्मान यांच्या एक महिन्यापूर्वीच्या त्या पोस्टवर का होतेय टीका?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे: साधारण एक महिन्यांपूर्वी औरंगाबादेत राहणाऱ्या नौशाद उस्मान यांनी केलेली एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. नौशाद उस्मान यांच्या पोस्टवर सडकून टीका होतेय. नौशाद उस्मान हे साप्ताहिक शोधन येथे पत्रकारही आहेत. शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घेत ते मांडणी करत असतात. तसेच ते जमात-ए-इस्लामचे देखील काम करतात. ते बहुतांश वेळेला इस्लामचा प्रचार करतात. ऑगस्टमध्ये नौशाद यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. यात त्यांनी एक फोटो पोस्ट केला असून फोटोमध्ये एका लहान बाहुलीला बुरखा घातलेला दिसून येतो आहे.

हेही वाचा: ठाकरे सरकार देणार चंद्रकांत पाटलांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे

काय आहे ही पोस्ट?

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नौशाद उस्मान यांनी म्हटलंय की, ही बाहुली दुकानातून आणली तेव्हा तिला फारच तोकडे कपडे पाश्चात्य कपडे होते. नंतर माझ्या लहान मुलींनी तिला असा सभ्य साज चढवला अन् ती जास्तच सुंदर दिसू लागली. खरं सौंदर्य उघडं पाडण्यात नसते तर इज्जत झाकणाऱ्या अशा सन्मानजनक पोशाखात असते, हेच यावरुन सिद्ध होते माशाल्लाह!

सोशल मीडियावरील पडसाद?

या पोस्टचा स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होतोय. यावर अनेकांनी आपली मते व्यक्त केली आहेत. अक्षय शारदा शरद या फेसबुक युझरने यासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, नाठाळाचे माथी हाणू काठी! सुधारणेचा 'आव' आणणाऱ्या मंडळींचं खोटेपण हे असं बाहेर पडत असतं. 'शब्दफेक' करून आपण लोकांना येडे बनवू शकतो हा भ्रम फार काळ टिकत नाही. तो पोकळ असतो. याची जाणीव त्यांना असेल नसेल. पण कधीना कधी ही माणसं अशी उघडी पडत असतात. बाईचं स्वातंत्र्य मारायचंय शिवाय आपण कित्ती सुधारणावादी आहोत हे दाखवायचंय मग काय करायचं? त्यासाठी अशा क्लुप्ल्या लढवायच्या. म्हणजे एका दगडात, दोन पक्षी. बाईचं सौंदर्य ठरवायचा आणि ते झाकायचा प्रयत्न करणारा हा 'बुरख्याआडचा' धुर्तपणा आहे. पुढे त्यांनी म्हटलंय की, अशा तथाकथित संस्कृती रक्षकांच्या नाठाळपणाच्या माथी काठी हाणावीच लागेल. त्यासाठी नौशाद नव्हे तर महिलांना आत्मभान देणाऱ्या हमीद दलवाईंचा मार्गच 'खरा' आहे.

हेही वाचा: पहिल्याच आमदारकीत मुख्यमंत्री; भूपेंद्र पटेलांनी घेतली शपथ

नौशाद उस्मान यांचे मत काय?

सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेबाबत नौशाद उस्मान यांचं मत जाणून घ्यायचा प्रयत्न ‘सकाळ डिजिटल’ने केला. ते म्हणतात, माझी लेकरं खेळत होती. त्यांनी स्वत: तिला कपडे घातल्यानंतर छान वाटली ती बाहुली. लहान मुलांची ती अभिव्यक्ती होती. ही लेकरांची मर्जी आहे.

पुढे त्यांनी टीका करणाऱ्यांविषयी म्हटलंय की, टीका करणाऱ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी ही पोस्ट डिलीट केली नाही. कुणीतरी रिपोर्ट केली असेल म्हणून फेसबुकने ती डिलीट केली असेल. आणि मी माझ्या मतावर ठाम आहे. बाईने बुरखा घालण्याचं मी समर्थन करतो. घटनेनं स्वातंत्र्य दिलं आहे. कुणी घुघंट घालतं, कुणी ओव्हरकोट घालतं. त्यामुळे बुरखा घालणं हे देखील स्वातंत्र्य आहे. ते फक्त एक वस्त्रप्रावधान आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

याबाबत आम्ही मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे प्रमुख शमशुद्दीन तांबोळी यांच्याशी बातचित केली. त्यांनी म्हटलंय की, अंत:स्थ विचार असतात तेच यापद्धतीने व्यक्त होत असतात. खरं सौंदर्य कशाला म्हणावं, हे व्यक्तीसापेक्ष आहे. त्यांनी ज्यापद्धतीने सजावट केली आहे, ती इस्लामी संस्कृतीला अनुसरुन आहे. मात्र, ही तालिबानचीच सुधारित आवृत्ती म्हणता येईल. सुधारित यासाठी की, डोकं झाकलं पाहिजे, हात झाकलं पाहिजे, स्कार्फ वापरला पाहिजे, हे सगळं बऱ्याचवेळा पिंजऱ्यातल्या पक्षासारखं असतं. ज्याला वाटतं की मी प्रोटेक्टेड आहे. बाहेर उडणाऱ्या पक्षाकडे बघून म्हणतो की, याला धोका आहे आणि मी सुरक्षित आहे. उडणाऱ्या पक्षाला मात्र मुक्त संचार करता येत असतो. या गोष्टीबद्दल विचार करण्याच्या क्षमतांवर काहीवेळा धर्म आणि संस्कृतीने मर्यादा घातलेल्या असतात. या मर्यादेच्या बाहेरचं जग त्यांना विद्रुप वाटायला लागतं आणि आपलंच सुसंस्कृत वाटायला लागतं. त्यामुळे अशांना फार महत्त्वच देऊ नये, असं मला वाटतं.

loading image
go to top