ठराविक कंत्राटदारांकडेच पालिकेचे झुकते माप का ?

baramati
baramati

बारामती : येथील नगरपालिकेमध्ये ठराविक कंत्राटदारांवर प्रशासन कसे मेहेरबान आहे आणि नगरपालिकेला कसे फसविले जाते याचा लेखाजोखा, कागदपत्रे आणि  पुराव्यांसह आज गटनेते सचिन सातव यांनी मांडल्यानंतर प्रशासन निरुत्तर झाले. अखेर मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त केली. 

अवघ्या एकाच विषयासाठी बोलावण्यात आलेली आजची सभा नगरसेवकांच्या संतप्त भावना व्यक्त करणारी तर नगराध्यक्षांच्या संयमाचा बांध फुटणारी वादळी अशीच ठरली. आजच्या बैठकीत नगरसेवक संजय संघवी, गणेश सोनवणे, अमर धुमाळ, नवनाथ बल्लाळ, सुनील सस्ते, विष्णुपंत चौधर, समीर चव्हाण, जय पाटील, किरण गुजर, अभिजित जाधव, सत्यव्रत काळे, सूरज सातव आदींनी मुख्याध्याकाऱ्यांसह प्रशासनाच्या कारभाराची लक्तरे काढली. 

सचिन सातव यांनी ईशान सिस्टीम्स या संगणक सेवा पुरविणाऱ्या कंत्राटदाराला ज्या दिवशी त्याने बिल अदा केले त्या दिवशी दोन तासात धनादेश कसा दिला गेला या बाबत कागदपत्रेच सभागृहासमोर सादर केली. दुसरीकडे या कंपनीचा मालक वेगळा तर नगरपालिकेचे धनादेश तिसऱयाच व्यक्तीकडून घेतले जात असून बॅंकेत बोगस खाते उघडून त्यात जमा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकारही त्यांनी कागदपत्रांनिशी उघड केला. 

इतर पुरवठादारांची सहा सहा महिने बिले काढली जात नाहीत आणि ईशान सिस्टीम्सचे दोन तासात सर्व प्रक्रीया पूर्ण करुन मुख्याधिकारी व नगराध्यक्ष त्या दिवशी उपस्थित नसतानाही बिल इतक्या तत्परतेने कसे काढले गेले, असा सवाल उपस्थित करुन नगरपालिका तिसरी शक्ती चालवत असल्याचा आरोप नगरसेवकांनी या वेळी केला. ज्या व्यक्तीचा या विषयाशी संबंध नाही त्याने बोगस उघडलेल्या खात्यात नगरपालिकेचे धनादेश जमा कसे होतात, असे असेल तर हा गंभीर विषय असून संबंधिताविरुध्द फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. यात सहभागी प्रत्येकाची चौकशी करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची ग्वाही मुख्याधिका-यांनी दिल्यानंतरच सभागृहातील वातावरण शांत झाले. 

कंत्राटदारच करुन आणत होते करारनामा....
सचिन सातव यांनी ''नगरपालिकेच्यावतीने एखादे काम मंजूर झाल्यानंतर त्याचा करारनामा कोठे व्हायला हवा'' , असा सवाल मुख्याधिकाऱ्यांना केला. ''नगरपालिकेत त्रिस्तरीय करारनामा होणे अपेक्षित असताना कंत्राटदार करारनामा करुन घेऊन येतात आणि काहीही न तपासता त्यावर नगरपालिका प्रशासन सह्या कशा काय करते'', असा सवाल सातव यांनी केला. संजय संघवी, अमर धुमाळ, जय पाटील, गणेश सोनवणे, सूरज सातव, यांनीही हा मुद्दा गंभीर असल्याचे नमूद केले. ''या पुढील काळात नगरपालिकेतच असे करार होतील याची काळजी घेतली जाईल'', असे मुख्याधिकाऱ्यांनी नमूद केले. मात्र असे असेल तर, या पूर्वी केलेल्या सर्वच करारनाम्यांच्या विश्वासार्हतेबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे नगरसेवकांनी नमूद केले. प्रशासन जर अशी कामे करत असेल तर, विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न सभागृहात उपस्थित केला गेला. ''या विषयांची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी व्हायला हवी'', अशी मागणी सुनील सस्ते यांनी  केली. 

सत्ताधारी नगरसेवकांचा संतापून उपोषणाचा इशारा
हरिकृपानगरमधील बागेतील पाण्याच्या कामाकडे लक्ष दिले जात नाही. वारंवार सांगूनही काम होत नाही. पुढील आठ दिवसात हे काम झाले नाही तर, आपण गटनेत्यांसह उपोषणाला बसू असा इशारा संजय संघवी यांनी दिली. दुसरीकडे, सुहासनगरमधील अनेकांना घरे देण्याची ग्वाही देऊन या विषयाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत नवनाथ बल्लाळ यांनी हे काम आठ दिवसात मार्गी लागले नाही तर, कुटुंबियांसह उपोषणाला बसू असा इशारा दिला.

नगरसेवक व नगराध्यक्षांत शाब्दिक चकमकी
''प्रश्न मांडल्यावर लगेच मुख्याधिकाऱ्यांना खुलासा करु द्या'', असे नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे वारंवार म्हणत होत्या, मात्र सत्ताधारी नगरसेवक आज ऐकून घेण्याच्या मनःस्थितीच नव्हते, त्यांनी आज इतक्या दिवसांचा असंतोष मनमोकळेपणाने व्यक्त केला. अनेकदा नगराध्यक्षांचा आवाज वाढला, तुम्ही बैठक चालू देणार आहे की नाही असा निर्वाणीचा सवाल तावरे यांनी विचारला, तुम्हाला बैठक चालूच द्यायची नसेल तर मी उठून जाईन असा इशारा नगराध्यक्षांनी दिल्यावरही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आपापले मुद्दे मांडल्यावरच मुख्याधिकाऱ्यांना बोलू दिले. मात्र चुकीचे काही होणार असेल तर त्याला कोणत्याही परिस्थितीत कोणीही असले तरी पाठीशी घातले जाणार नाही, असे नगराध्यक्षांनी नमूद केले. 

ठराविक कंत्राटदारांवर मेहेरबानी कशासाठी...
बारामती नगरपालिकेतील काही ठराविक कंत्राटदारांवर नगरपालिका प्रशासनाकडून मेहेरबानी कशासाठी दाखविली जाते, असा संतप्त सवाल नगरसेवकांनी विचारला. काही कंत्राटदारांची बिले वेगाने काढली जातात, काहींना वारंवार त्रास दिला जातो, या मागे काही आर्थिक गणिते आहेत का, याचा खुलासा करावा अशीही मागणी नगरसेवकांनी केली. 

नगरसेवकही वैतागले
आजच्या बैठकीत नगराध्यक्षा व नगरसेवक यांच्यातही अनेकदा चकमकी झाल्या. नगरसेवकांना बोलायचे होते मात्र नगराध्यक्षा मुख्याधिकाऱ्यांना बोलू द्या असे म्हणत होत्या, या वरुन अनेकदा नगराध्यक्षांचा आवाज वाढत होता, नगरसेवकही आम्हाला बोलू द्या , असे म्हणत रेटून बोलत होते. सभागृहात वेळेचे बंधन घालू नका बोलू द्या , असे नगरसेवक बोलत असल्याने अनेकदा गोंधळ होत होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com