पंतप्रधान मोदीच्या 'सीरम' भेटीबद्दल काय म्हणतायेत वैज्ञानिक?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 November 2020

पंतप्रधानांनी शनिवारी पुण्यासह हैदराबाद आणि अहमदाबादच्या लस उत्पादक संस्थांना भेट दिली. त्या पार्श्‍वभूमीवर विविध शास्त्रज्ञांशी सकाळने संवाद साधला. कोरोना लशींच्या साठवणूक आणि वितरणासाठी वेगवेगळ्या यंत्रणा लागणार आहे. तसेच त्यांची सद्यःस्थिती जाणून घेणे भारता सारख्या विशाल देशासाठी आवश्‍यक आहे.

पुणे : कोरोना लशींच्या वितरणासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन खरी स्थिती समजून घेणे आवश्‍यक आहे. लशींसंदर्भातील धोरणात्मक निर्णयासाठी त्यामागचे विज्ञान समजून घेणे आवश्‍यक आहे. पंतप्रधानांनी उत्पादक कंपन्यांना भेटी देणे निश्‍चितच स्वागतार्ह आहे, असे मत वैज्ञानिक समुदायाने व्यक्त केले आहे. 

पंतप्रधानांनी शनिवारी पुण्यासह हैदराबाद आणि अहमदाबादच्या लस उत्पादक संस्थांना भेट दिली. त्या पार्श्‍वभूमीवर विविध शास्त्रज्ञांशी सकाळने संवाद साधला. कोरोना लशींच्या साठवणूक आणि वितरणासाठी वेगवेगळ्या यंत्रणा लागणार आहे. तसेच त्यांची सद्यःस्थिती जाणून घेणे भारता सारख्या विशाल देशासाठी आवश्‍यक आहे. अशा पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानासारख्या व्यक्तीने स्वतः लक्ष घालणे आश्‍वासक आहे. पण त्याचबरोबर देशातील विविध वैज्ञानिक संस्थांना सातत्याने प्रशासनातील लोकांनी भेट देणे गरजेचे आहे. यामुळे त्यात कार्य करणाऱ्या शास्त्रज्ञांसह कर्मचाऱ्यांचेही मनोबल उंचावले जाते, असे मत वैज्ञानिक समुदायाने व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

वैज्ञानिकांचे मत 
- पंतप्रधानांच्या भेटीने कोरोना लशी संदर्भातील अनिश्‍चितता कमी होईल 
- प्रथमच आरएनए बेस्ड लशींचा वापर होणार आहे. त्यासंबंधी प्रशासन गंभीर असल्याचे स्पष्ट होते 
- लशीची सद्यःस्थिती प्रशासनाच्या लक्षात येईल, तसेच शितगृहांची उभारणी आणि वितरणाची निकटही समजेल 
- 130 कोटी लोकसंख्येला लसीकरणाची यंत्रणा, आराखडा तयार करण्यास मदत होईल 
- पंतप्रधानांसारख्या उच्चपदस्थांनी अशा भेटी वेळोवेळी देणे गरजेचे

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याची रंगीत तालीम पूर्ण; दिल्लीहून विशेष सुरक्षा पथके दाखल 

''विविध लशींच्या प्रगती विषयीचा खुलासा त्या त्या लोकांकडून होणे आवश्‍यक होते. लशीसंदर्भात खरी काय परिस्थिती काय आहे, वितरणाची व्यवस्था कशी असावी, यासंबंधीचा आढावा पंतप्रधानांना घेता येईल. त्यादृष्टीने ही भेट आवश्‍यक होती.'' 
- डॉ. अरविंद नातू, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, आयसर. 

''भारतासारख्या देशामध्ये जेथे 130 कोटी लोक आहेत. त्यांच्या लसीकरणासाठी योजना तर चांगली आखावी तर लागेल त्याचबरोबर प्रयत्नही चांगले करावे लागतील. सामान्यांना परवडणाऱ्या दरामध्ये लस उपलब्ध करून देण्यासाठी एकापेक्षा अधिक पर्याय शोधणे आवश्‍यक आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांचा असा पुढाकार गरजेचा आहे.'' 
- डॉ. पंडित विद्यासागर, जैवभौतिकशास्त्रज्ञ, माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ. 

''लशींच्या वितरणासंबंधी सरकार आणि प्रशासन किती गंभीर आहे, हे यातून दिसते. वेगवेगळ्या लशींसाठी भिन्न तापमानाची गरज आहे. सरकार त्या दृष्टीने योग्य वेळी योग्य हालचाल करतेय हे सामान्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.'' 
- डॉ. योगेश शौचे, सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ, राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र. 

''प्रशासनातील उच्चपदस्थांच्या अशा भेटी वेळोवेळी होणे आवश्‍यक आहे. यामुळे मोठ्या कंपन्यांतील संशोधकांसह स्टार्टअप्समधील नवसंशोधकांना नैतिक आधारही वाटतो. अशा भेटींमधून आर्थिक आणि इतर समस्यांचे समाधानही करता येते.''
- डॉ. गीतांजली तोमर, जीवशास्त्रज्ञ, आयबीबी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why Prime Minister Modi's visit to Serum institute for Corona Vaccine