esakal | घरभाड्यासाठी साठवून ठेवलेले पैसे पतीने दारु पिण्यासाठी वापरल्याने पत्नीची आत्महत्या

बोलून बातमी शोधा

crime
घरभाड्यासाठी साठवलेले पैसे पतीने दारूत घातल्याने पत्नीची आत्महत्या
sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

पुणे ः तिने त्याच्यावर प्रेम केले. पुढे प्रेमविवाहानंतर संसाराची गाडी रुळावर आली. त्यानंतर मात्र पती दारुच्या आहारी गेला, पत्नी घर खर्चातीलच दोन पैसे बाजूला ठेवून त्यातून घरभाडे, वीजबीलही भरत होती. पण तेही पैसे चोरुन पतीने दारुमध्ये घालविले. या कारणामुळे दोघात कडाक्‍याची भांडणे झाली. या सततच्या त्रासाला कंटाळून तिने रागाच्या भरात स्वतःला जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. अखेर उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. हा धक्कादायक प्रकार उंड्री येथे 12 एप्रिल रोजी घडला.

हेही वाचा: कोरोना काळातही ग्रामसेवक, तलाठी यांची गावाला दांडी

अंकिता कुंदन कांबळे (वय 25, रा. उंड्री ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती कुंदन कांबळे (वय 29) याच्याविरूद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अंकिताचे वडील व्यंकट जाधव (वय 52) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदन व अंकीता यांचा 2017 मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर त्यांचा संसार चांगल्या पद्धतीने सुरू होता. लग्नाच्या काही महिन्यानंतर कुंदनला दारुचे व्यसन लागले. तो दारुच्या आहारी गेल्याने त्यांना घरभाडे, वीजबील देण्यासाठी अक्षरशः तारांबळ होत होती. त्यातही संसार व दिड वर्षांच्या मुलीचे पालनपोषण करण्यावर ती भर देत होती.

दरम्यान, अंकीता दैनंदिन घरखर्चाच्या पैशात काटकसर करून काही पैसे साठवून ठेवत होती. त्याबाबत कुंदनला माहिती नसे. परंतु 12 एप्रिलला अंकिताने घरभाडे व वीजबीलासाठी ठेवलेले पैसे कुंदनने चोरले. त्या पैशाची दारु पिऊन सायंकाळी साडे सात वाजता तो घरी आला. त्यावेळी तिला हा प्रकार कळल्यानंतर दोघांमध्ये कडाक्‍याची भांडणे झाली. राग सहन न झाल्यामुळे अंकिताने स्वतःवर रॉकेल ओतुन पेटवून घेतले. त्यानंतर तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ससूनमध्ये उपचार सुरू असतानाच 24 एप्रिलला रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यु झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषीत केले. दरम्यान, पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मधाळे करीत आहेत.

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर