महंमदवाडीत पतीकडून पत्नीचा खून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

पतीने दारूच्या नशेत पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून खून केला. ही घटना रविवारी मध्यरात्री वानवडीतील महंमदवाडी येथे घडली. 

पुणे - पत्नीच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेणाऱ्या पतीने दारूच्या नशेत पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून खून केला. ही घटना रविवारी मध्यरात्री वानवडीतील महंमदवाडी येथे घडली. 

संगीता श्रीकांत चव्हाण (वय 26, रा. वाडकर मळा, महंमदवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी संगीता यांच्या आई ताराबाई राठोड (वय 50, रा. कर्नाळा, कर्नाटक) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पती श्रीकांत कमाल चव्हाण (वय 32) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता व श्रीकांत हे दोघेही मूळचे कर्नाटकमधील विजापूर येथील आहेत. कामाच्या निमित्ताने ते पुण्यात आले होते. हडपसर परिसरात ते मजुरीचे काम करत होते. वाडकर मळ्यातील कामगार वस्तीमध्ये ते वास्तव्यास होते. दरम्यान, श्रीकांत हा संगीताच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेऊन तिला मारहाण करत होता. रविवारी रात्री त्या दोघांची चांगली भांडणे झाली. त्यानंतर राग असल्याने श्रीकांतने घरातील कुऱ्हाड संगीता यांच्या डोक्‍यात घालून खून केला. त्यानंतर तो तेथून पळून गेला. 

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सुनील भोसले यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. श्रीकांतला शोधण्यासाठी पोलिसांचे एक पथक पाठविण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक रावसाहेब भापकर करत आहेत. 

Web Title: Wife murder from husband in Hadapsar