esakal | पैसे चोरल्याचा जाब विचारणाऱ्या पत्नीची दारुड्या पतीकडून हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

पैसे चोरल्याचा जाब विचारणाऱ्या पत्नीची दारुड्या पतीकडून हत्या

पैसे चोरल्याचा जाब विचारणाऱ्या पत्नीची दारुड्या पतीकडून हत्या

sakal_logo
By
निलेश बोरूडे

किरकटवाडी : मोलमजुरी करून घरखर्च भागविण्यासाठी जमवून ठेवलेले पैसे चोरल्याचा जाब विचारणाऱ्या पत्नीची दारुड्या पतीने धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना खडकवासला धरणाला लागून असलेल्या मांडवी बुद्रुक (ता. हवेली) येथील कातकरी वस्तीवर घडली आहे. मंगल लहाणु वाघमारे (वय 45) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून आरोपी पती लहाणु श्रावण वाघमारे (वय 50) हा फरार झाला आहे.

आरोपी लहाणु वाघमारे यास दारु पिण्याचे व्यसन होते. दारु पिण्यासाठी तो पत्नी मंगल हीस वारंवार मारहाण करुन पैसे घेत असे.भावांचे निधन झाल्याने मंगल वाघमारे ही पती व दोन मुलांसह मागील दहा वर्षांपासून मांडवी बुद्रुक येथे आईकडे राहण्यास होती. मोलमजुरी करून ती घर चालवत होती. रोजंदारी करुन कमवलेले पैसे मंगल वाघमारे घरातच लपवून ठेवत असे.

हेही वाचा: पुणे : भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर कोऱ्हाळेतील मुकुल इंगळे

सोमवारी संध्याकाळी कामावरून आल्यावर घरातील पैसे नवऱ्याने चोरल्याचे मंगलच्या लक्षात आले. रात्री दारु पिऊन घरी आलेल्या पतीला तीने पैसे का चोरले असा जाब विचारला. त्यावेळी लहाणु वाघमारे याने दारुच्या नशेत दगड,विटांनी मारहाण केली व घराचा दरवाजा आतून बंद केला. मंगल वाघमारेच्या सत्तर वर्षीय आईने खुप वेळा प्रयत्न केला परंतु त्याने दरवाजा उघडला नाही. शेवटी मंगल वाघमारे यांची आई व मुले शेजाऱ्यांकडे झोपायला गेले. सकाळी उठल्यावर मंगल यांच्या आईने पुन्हा घरी येऊन पाहिले असता घराचा दरवाजा उघडा होता व मंगल वाघमारे या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने खोल जखमा दिसत होत्या. यामध्ये मंगल वाघमारे यांचा जागेवरच मृत्यू झाला होता तर लहाणु वाघमारे हा रात्रीचाच फरार झाला होता. याबाबत माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम व इतर पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. आरोपी लहाणु वाघमारे याच्या विरोधात हवेली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये खासगी रुग्णालयांत केवळ ५०२ रुग्ण

loading image