‘वाय-फाय’युक्त योजनेस हरताळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

पुणे - पुणे महापालिका आणि स्मार्ट सिटीचे प्रशासन यांच्यात विसंवाद असल्यामुळे शहरातील ११५ ठिकाणे वाय-फाययुक्त करण्याच्या प्रयत्नांना हरताळ फासला गेला. त्यासाठी फक्त दीड ते दोन किलोमीटर खोदकाम करायचे आहे; परंतु त्यासाठी तंत्रज्ञान कोणते वापरायचे, यासाठीचा पेच निर्माण झाल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून याबाबतचा प्रस्ताव रखडला आहे. 

स्मार्ट सिटीअंतर्गत औंध, बाणेर आणि बालेवाडीमध्ये पहिल्या टप्प्यात १८ ठिकाणी नागरिकांना ‘वाय-फाय’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे; तर शहरातील १९९ ठिकाणी ही सुविधा आहे. त्यात आणखी ११५ ठिकाणांचा समावेश स्मार्ट सिटी प्रशासनाला करायचा आहे. त्यासाठी कोणताही जादा खर्च प्रशासनाला येणार नाही. शहरात; तसेच औंध, बाणेर बालेवाडीमध्ये यापूर्वी बसविलेल्या स्मार्ट ‘पोल’च्या जवळ ३५ ते ८० मीटर खोदकाम करून केबल टाकायची आहे. त्यामुळे परिसरातील नव्या ठिकाणांचा समावेश या योजनेत होऊ शकतो. स्मार्ट सिटी प्रशासनाने त्यासाठी ऑगस्टमध्ये महापालिकेच्या पथ विभागाकडे प्रस्ताव सादर केला. तेव्हा पावसाळ्यामुळे खोदकाम करण्यास महापालिकेने बंदी घातली होती. त्यामुळे याबाबतची परवानगी सप्टेंबरनंतर देण्यात येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले होते; परंतु त्यानंतर स्मार्ट सिटी प्रशासनाने पाठपुरावा करूनही परवानगी मिळालेली नाही.

शहर ‘वाय-फाय’युक्त करण्याची स्मार्ट सिटीची योजना आहे. त्यासाठीचे काम वेगाने सुरू आहे. खोदकामासाठी महापालिकेने परवानगी दिली, तर ही योजना वेगाने पूर्ण होऊ शकेल. संबंधित कंत्राटदाराबरोबर झालेल्या करारानुसार खोदाईची परवानगी मागितली आहे.
- राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी

सध्या फक्त एमएनजीएल आणि वीजपुरवठ्यासाठी एमएसईडीसीएल याच कंपन्यांना खोदाईची परवानगी दिली आहे. स्मार्ट सिटीने आधुनिक तंत्रज्ञान वापरून खोदाई करू, असे सांगितल्यास परवानगी दिली जाईल.
- अनिरुद्ध पावसकर, पथ विभागप्रमुख, पुणे महापालिका

Web Title: Wifi Facility Scheme Issue Smart City