गडकरींचा पुतळा पुन्हा बसविणार : पुण्याचे महापौर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

पुणे : 'ज्या माणसाने 'महाराष्ट्र गीत' लिहिले, त्याच्याबद्दल आपण हे असे वागणार? पुतळा फोडून राम गणेश गडकरी यांचे कर्तृत्व झाकोळून जाईल, असे समजणे हा मूर्खपणा आहे. महाराष्ट्रातील कोणताही सुसंस्कृत मनुष्य हे कृत्य मान्य करूच शकणार नाही,' अशा शब्दांत ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी आज (मंगळवार) प्रतिक्रिया व्यक्त केली. संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा फोडल्याप्रकरणी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. 'गडकरी यांचा पुतळा दोन दिवसांत पुन्हा बसविणार,' अशी घोषणा महापौर प्रशांत जगताप यांनी केली.

'गडकरी यांचा पुतळा फोडून पुणेकरांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे,' असा आरोपही महापौर जगताप यांनी केला. 'प्रसिद्धी मिळविण्यासाठीचे हे कृत्य आहे,' अशा शब्दांत किरण यज्ञोपवित यांनी या कृतीवर टीका केली. 'नाटककार राम गणेश गडकरी यांनी अनेक कलावंतांना घडवले. अशा आद्यप्रवर्तक मानल्या जाणाऱ्या नाटककाराचा पुतळा काढणे म्हणजे घृणास्पदच प्रकार आहे. हा एका व्यक्तीचा नव्हे तर रंगभूमीचाच अपमान आहे' अशी प्रतिक्रिया अभिनेते प्रसाद ओक यांनी व्यक्त केली.

गडकरी यांचा पुतळा फोडल्याचे उघडकीस आल्यानंतर शहरातील विचारवंत आणि कलाकारांनी या घटनेचा निषेध केला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (पुणे आणि कोथरुड शाखा), महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांनी एकत्र येऊन या आंदोलन केले. यावेळी लेखक-नाटककार श्रीनिवास भणगे, किरण यज्ञोपवीत, डॉ. सतीश देसाई, प्रा. मिलिंद जोशी, प्रसाद ओक, योगेश सोमण, श्रीराम रानडे, प्रविण तरडे, सुरेश देशमुख, सुनील महाजन, दीपक रेगे, प्रकाश पायगुडे, सुनीताराजे पवार, रवी मुकुल, मकरंद टिल्लू, मेघराजराजे भोसले, निकीता मोघे, रजनी भट, उद्धव कानडे यांच्यासह इतर लेखक-कलावंत आणि विविध संस्थांतील पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

'राजसंन्यास'मध्ये गडकरी यांनी केलेले काही लेखन चुकीचे असेल. या लेखनाचा विरोध करायचाच असेल तर घटनेच्या चौकटीत राहून करता येऊ शकतो; पण आज घडलेला विकृत प्रकार निषेधार्हच आहे.''
- डॉ. श्रीपाल सबनीस, संमेलनाध्यक्ष

Web Title: Will erect statue of Gadkari again : Pune Mayour