कसोटी क्रिकेटमधील नवीन बदलांना यश मिळो : कपिल देव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

चिंचवड येथील एका शाळेच्या क्रीडा मैदानाचे उद्‌घाटन कपिल देव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी, त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसमवेत क्रिकेटचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांच्या गोलंदाजीवर काही काळ फलंदाजी केली. त्यानंतर, विद्यार्थी आणि पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील भावना व्यक्त केली. 
 

पिंपरी : ''ज्या लोकांनी क्रिकेट खेळले आहे. त्यांना कसोटी क्रिकेट पहायला आवडते. मग, ते दिवस-रात्र असो किंवा गुलाबी चेंडूवरचे. आपल्या सर्वांना कसोटी क्रिकेट विसरता येणार नाही. आयसीसी आणि बीसीसीआय कसोटी क्रिकेटमध्ये जे काही बदल करत आहेत. त्यांना यश मिळू देत.'', असा आशावाद भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केला.
 
चिंचवड येथील एका शाळेच्या क्रीडा मैदानाचे उद्‌घाटन कपिल देव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी, त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसमवेत क्रिकेटचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांच्या गोलंदाजीवर काही काळ फलंदाजी केली. त्यानंतर, विद्यार्थी आणि पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील भावना व्यक्त केली. 

1983 च्या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आठवणी जागविताना कपिल देव म्हणाले,"देशासाठी आपण जेव्हा खेळतो. तेव्हा, स्वतःचे जीवन विसरुन जातो. ते करताना तुम्हाला कोणत्याही प्रेरणेची गरज भासत नाही. तुम्ही स्वयंप्रेरणेने भरलेले असता. 1983 च्या विश्‍वचषकाचा प्रवास खूप थरारक आणि विस्मयकारक ठरला. देशासाठी उपांत्य आणि अंतिम फेरीपर्यंत खेळायचे एवढेच तेव्हा माझ्या मनात होते. तुम्हाला जर खेळण्यासाठी "पॅशन' असेल तर तुमच्या समोर कोणतीही आव्हान राहणार नाही. परंतु, तुम्ही काहीच केले नाही तर मात्र, तुमच्यासमोर अडचणी येत राहतात. झिंबाब्वे विरुद्धचा तो सामना खूप अवघड होता. परंतु, त्यावेळेस मी खेळण्याचा आनंद घेतला.'' 

क्रिकेटपटू नाही तर खेळाडू व्हायचे होते.
''मला फक्त क्रिकेटपटू व्हायचे नव्हते. केवळ खेळाडू व्हायचे होते. मात्र, मी प्रत्येक वेळेस खेळण्याचा आनंद घेतला. उत्तम अष्टपैलू खेळाडू होण्यासाठी मैदानावर कठोर मेहनत करण्याशिवाय पर्याय नाही, असा कानमंत्रही कपिल देव यांनी दिला. पुणे परिसराबद्दलच्या आठवणी सांगताना कपिल देव म्हणाले,"लहान वयात मोजके सामने खेळलो. मात्र, खेळपट्टी फलंदाजीला पोषक असल्याने गोलंदाजांची नेहमी धुलाई व्हायची. विद्यार्थी मैदानावर जास्तीत जास्त संख्येने उतरतील तेव्हा, क्रीडा संस्कृती रुजेल. त्यामुळे, मुलांनी नियमितपणे खेळावे,'' असे आवाहनही त्यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Get success for New Test cricket changes said Kapil Dev