पंतप्रधान करणार मेट्रोचे भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबर रोजी "एसएसपीएमएस'च्या मैदानावर होणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. याबाबत केंद्र सरकारने महापालिकेला कळविले आहे. मात्र, कार्यक्रमाचे संयोजन केंद्र सरकार, राज्य सरकार की महापालिका करणार, हे अद्याप निश्‍चित झालेले नाही.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील (आरटीओ) एसएसपीएमएसच्या मैदानावर शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोचे ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन होणार आहे. त्याची प्रशासकीय तयारी जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रशासनाकडून सुरू झाली आहे. मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असले तरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते गुरुवारी (ता.22) भूमिपूजन करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. मात्र, त्याबाबत सर्वपक्षीय राजकीय सहमती घडविण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

कॉंग्रेसची भूमिका वेगळी
दरम्यान, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी महापौर प्रशांत जगताप यांची गुरुवारी भेट घेतली. राष्ट्रवादीतर्फे 22 डिसेंबरला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते मेट्रोचे भूमिपूजन होणार आहे. त्या वेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करावे, अशी मागणी केली. मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा कॉंग्रेसने महापालिकेत या पूर्वी सातत्याने केल्याचेही बागवे यांनी महापौरांच्या निदर्शनास आणले. कॉंग्रेसला डावलून कार्यक्रम झाल्यास आमचा विरोध असेल, असेही स्पष्ट केले.

Web Title: Will the Prime Minister laid foundation stone of Metro