क्‍लासला न जाताही द्या टंकलेखन परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

टंकलेखनासाठी बहिःस्थ पद्धत विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून योग्य निर्णय आहे. त्या संबंधीचे नियम राज्य सरकारने दिले आहेत. त्याची नियमपुस्तिका तयार करून वितरित केली जाणार आहे. कार्यकारी समितीच्या मान्यतेनंतर त्याची प्रक्रिया सुरू होईल.
- सुखदेव डेरे, आयुक्त, राज्य परीक्षा परिषद

पुणे - टंकलेखन म्हणजेच टायपिंगच्या क्‍लासला न जाताही एखादी व्यक्ती टंकलेखन करू शकत असेल, तर त्याला आता बहिःस्थ विद्यार्थी म्हणून राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाणारी संगणक टंकलेखनाची परीक्षा देता येणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने संगणक टंकलेखन परीक्षेच्या सुधारित नियमांना मान्यता दिली आहे. त्यामध्ये संगणकावर टंकलेखन करता येणाऱ्या कुणालाही आता ही परीक्षा देता येईल. त्यात उत्तीर्ण झाल्यास परिषदेचे प्रमाणपत्रही मिळणार आहे. टंकलेखन संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी त्या त्या संस्थांची असते. परंतु बहिःस्थ म्हणून थेट परीक्षा द्यायची असेल, अशा विद्यार्थ्यांना परिषदेकडून स्वतंत्र "लॉग इन आयडी' आणि "पासवर्ड' घ्यावा लागेल. त्याद्वारे ऑनलाइन अर्ज भरावा लागेल.

परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे म्हणाले, 'संगणक टंकलेखनाची परीक्षा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात होईल. त्याचे अर्ज विद्यार्थ्यांकडून भरून घेण्यात आले आहेत. त्यामुळे बहिःस्थ विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार नाही. मे-जून महिन्यांत होणाऱ्या संगणक टंकलेखन परीक्षेला मात्र त्यांना बसता येईल.''

टंकलेखनाची परीक्षा देण्यासाठी पात्रतेसंबंधी कागदपत्रांची तपासणी करून घ्यावी लागते. जे विद्यार्थी संस्थांमध्ये टंकलेखन शिकतात, त्यांची तपासणी संस्था करून घेते. परंतु बहिःस्थ विद्यार्थ्यांचे काय, या प्रश्‍नावर डेरे म्हणाले, ""बहिःस्थ विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी केंद्रे देता येतील. मात्र, बहिःस्थ विद्यार्थ्यांबाबत नव्यानेच निर्णय जारी झाल्याने त्यासंबंधी कशी अंमलबजावणी करायची, हे परिषदेच्या कार्यकारी समितीमध्ये निश्‍चित केले जाईल.''

सहायक आयुक्त राजेंद्र क्षीरसागर म्हणाले, 'टंकलेखनाची परीक्षा देण्यासाठी किमान आठवी उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. हा नियम बहिःस्थ विद्यार्थ्यांनाही लागू असेल. नव्या नियमानुसार 40 शब्द प्रतिमिनीट पारंपरिक टंकलेखन (मॅन्युअल) परीक्षेसाठी आता 30 शब्द प्रतिमिनीट ही परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. संगणक टंकलेखनासाठी विशेष कौशल्य अभ्यासक्रम वगळता अन्य मराठी, इंग्रजी आणि हिंदी टंकलेखन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पूर्वअट ठेवण्यात आलेली नाही.''

Web Title: without class typewriting exam