पुणे शहरातील ३६ हजार महिला ‘बडीकॉप’च्या सदस्या

पांडुरंग सरोदे
सोमवार, 21 जानेवारी 2019

पुणे - नामांकित कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलेचा भरधाव कार चालविण्याच्या कारणावरून कॅबचालकाबरोबर वाद झाला. कारचालकाच्या उद्धट वर्तनाबाबत महिलेने मोबाईलवरून पोलिसांच्या ‘बडीकॉप’ व्हॉट्‌सॲप ग्रुपवर एक मेसेज पाठविला. काही मिनिटांतच पोलिसांनी कॅबचालकास पोलिसी खाक्‍या दाखविला! आयटी, कॉर्पोरेट कंपन्यांपासून ते खासगी, सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांना सध्या ‘बडीकॉप’चा आधार मिळू लागला आहे. सुस्तावलेल्या ‘बडीकॉप’ ग्रुपने आता कात टाकण्यास सुरवात केली असून, ‘बडीकॉप’ ग्रुपच्या पुर्नरचनेनंतर सध्या ३६ हजार महिला त्याच्या सदस्या झाल्या आहेत.  

आयटी व कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांना मदत मिळावी, या हेतूने तत्कालीन पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी ‘बडीकॉप’ ही संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरविली होती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट झाल्यानंतर या उपक्रमाकडे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होऊ लागले. त्यातच नव्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या रचनेमुळे ‘बडीकॉप’ उपक्रमामध्ये अधिकच सुस्तावलेपण आले. दरम्यान, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी ‘भरोसा सेल’च्या माध्यमातून महिला, बालक व ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्‍नांची दखल घेण्यास, तसेच ‘बडीकॉप’ला प्राधान्य देत महिलांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने पाहण्यास सुरवात केली. त्यामुळे ‘बडीकॉप’ ग्रुप पुन्हा एकदा अधिक गतीने सक्रिय झाल्याचे दिसत आहे.

 महिला त्यांना येणाऱ्या कोणत्याही अडचणी तत्काळ ‘बडीकॉप’ग्रुपवर टाकतात. सध्या या उपक्रमाबाबत जनजागृती सुरू आहे.  
- राधिका फडके, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.

 आमच्या ‘बडीकॉप’ ग्रुपमध्ये आयटी, कॉर्पोरेट, शैक्षणिक संस्था, खासगी-सरकारी कार्यालयांमधील महिलांचा समावेश आहे. आम्ही पोलिस कर्मचारी पाठवून तातडीने त्यांची समस्या सोडवितो.
- दयानंद ढोमे, पोलिस निरीक्षक, चतुःश्रुंगी पोलिस ठाणे.

 नोकरदार महिलांना ऐनवेळी येणाऱ्या अडचणींबाबत कुठे तक्रार करावी, असा प्रश्‍न असतो. ‘बडीकॉप’ व्हॉट्‌सॲप ग्रुपमुळे हा प्रश्‍न सुटला आहे. 
- महिला संगणक अभियंता , औंध.

असे व्हा सदस्य
महिला व युवतींना आपल्या कंपनीच्या मनुष्यबळ विभागामार्फत किंवा स्वतः पोलिस ठाण्यांशी थेट संपर्क साधून ‘बडीकॉप’ व्हॉट्‌सॲप ग्रुपमध्ये सहभाग घेता येईल.

या ठाण्यांत आहेत ग्रुप
आयटी व कॉर्पोरेट कंपन्या, सरकारी-खासगी कार्यालये सर्वाधिक असणाऱ्या भागांमध्येच ‘बडीकॉप’ उपक्रम राबविला जातो. त्यामध्ये चंदननगर, कोंढवा, मुंढवा, विश्रांतवाडी, खडकी, येरवडा, विमानतळ, चतुःश्रुंगी, हडपसर, वानवडी या पोलिस ठाण्यांचा समावेश आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये सव्वालाख सदस्या
पुणे पोलिस आयुक्तालयाचे विभाजन होण्यापूर्वी ‘बडीकॉप’ ग्रुप २३ पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत होते. त्यामध्ये सव्वालाखांहून अधिक महिला ‘बडीकॉप’च्या सदस्या होत्या. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर हिंजवडी आयटी पार्क त्या पोलिस आयुक्तालयामध्ये गेले. त्यामुळे ‘बडीकॉप’मधील एक लाखाहून अधिक महिला सदस्यांची संख्या कमी झाली. त्यानंतर पुण्यातील ‘बडीकॉप’ ग्रुपही थंडावले होते. मात्र, डॉ. वेंकटेशम यांच्या आदेशानंतर पुन्हा एकदा ‘बडीकॉप’ ग्रुप सक्रिय झाले आहेत.

Web Title: Woman Buddycop Member Police