
पुणे : आईचा कोरोना रिपोर्ट पाॅजिटिव्ह आला, तिची ऑक्सिजन लेव्हल ८१ पर्यंत खाली आली होती. आईला लवकर बेड मिळावा, उपचार सुरू व्हावेत यासाठी स्वतः पाॅझिटिव्ह असूनही मुलाने प्रयत्न सुरू केले. आईला गाडीत बसवून तो ससून, जम्बो रुग्णालयासह ८-९ रुग्णालयात गेला. त्याला कोठेच मदत मिळाली नाही. रुग्णालये दारात उभे करत नव्हते अशा स्थितीत त्याच्या आईचा प्रकृती चिंताजनक झाली. उपचाराची वाट पाहत १५ तासाच्या झुंजीनंतर गाडीतच आईने जीव सोडला. ही हृदयद्रावक घटना पुण्यात घडली असून, कोरोनाने घातलेल्या थैमानात कुचकामी यंत्रणेची पोलखोल झाली आहे.
अरुलमेरी अँन्थनी (वय ७३, रा. रामवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अरुलमेरी आणि त्यांचा मुलगा आरकीदास या दोघांनी कोरोना चाचणी केली, त्यात दोघेही गुरुवारी (ता.१) रोजी दोघेही पाॅजिटिव्ह आले. आरकीदास यांच्या आईची ऑक्सिजन लेव्हल कमी असल्याने त्यांना त्रास झाला.
सायंकाळी सातच्या सुमारास आरकीदास यांनी आईला घेऊन येरवड्यातील संत ज्ञानेश्वर वसतीगृहातील कोरोना सेंटर घेऊन आले. पण तेथे ऑक्सिजन बेड नसल्याने त्यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पत्र देऊन ससून रुग्णालय पाठवले. मात्र, सासूनमध्ये ऑक्सिजन बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. तेथे किमान एक तास वाया गेला.
आरकीदास आणि त्यांच्या मित्रांनी रुग्णालयांमध्ये फोन करून बेडचा शोध सुरू केला. त्यावेळी जम्बो कोविड रुग्णालयामध्ये बेड शिल्लक असल्याचे कळाले. तेथे गेल्यावर सुरक्षा रक्षकांनी अडवून हेल्पलाईनवर संपर्क करा, त्यांनी आम्हाला परवानगी दिली की आत सोडू असे सांगितले. कोविड सेंटरचा हेल्पलाईन क्रमांक दीड तास व्यस्त होता. फोन लागत असल्याने व आईची स्थिती पाहून आरकीदास यांची बैचेनी वाढली. हेल्पलाईनवर फोन लागला, सर्व माहिती दिली, तुम्हाला पाच मिनिटांमध्ये कळवतो असे तेथील समुपदेशकाने सांगितले. पण, बराच वेळ होऊन गेला तरी कोणताही माहिती मिळाली नाही.
हतबल झालेले आरकीदास आईला घेऊन मध्यरात्री साडेतीनला घरी आले, दोघांनाही झोप नव्हती, मित्र बेड शोधत होते. सकाळी सहा पासून पुन्हा खराडी, वाघोली, येरवडा या भागातील जवळपास सहा रूग्णालयात आरकीदास आईला घेऊन गेले. त्यावेळी आईची ऑक्सिजन लेव्हल ५० पर्यंत खाली आलेली. आईला कुठे तरी उपचार मिळावेत तिचा जीव वाचावा म्हणून धडपड सुरू होती, पण आमच्याकडे ऑक्सिजन बेड उपलब्ध नाही, आमच्याकडे व्हेंटिलेटर नाही असे सांगून प्रवेश नाकाराला.
अखेर शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरातील रुबी क्लिनिकमध्ये बेड उपलब्ध होऊ शकतो अशी माहिती मिळाली, आरकीदास यांनी त्या दिशेने प्रवास सुरू केला पण खराडी बायपासच्या सिग्नलवर त्यांच्या आईने गाडीतच प्राण सोडले.
बेड मिळेल याची आईला होता विश्वास
ऑक्सिजन लेव्हल कमी होत असल्याने आईची प्रकृती बिघडत होती, पण आरकीदास यांची धडपड बघून बेड मिळेल, असे आई त्यांना सांगत होती. अखेरच्या श्वासापर्यंत माझी आई मला बोलत होती, पण ती अचानक थांबली असे सांगताना आरकीदास यांच्या अश्रूचा बांध फुटला.
"आईला ऑक्सिजन बेड मिळावा म्हणून रात्रभर ससून, जम्बो पासून अनेक रुग्णालयात गेलो, पण कुठेही बेड मिळाला नाही. हेल्पलाईनच्या निरोपाची वाट पाहणे म्हणजे मृत्यूची वाट पहाण्यासारखेच आहे. डॅशबोर्डवर बेड उपलब्ध असल्याचे दाखवले जाते पण रुग्णालयात बेड नाही असे थेट सांगितले जाते. माझी आई गेली, पण यापुढे खोट बोलून सामान्य नागरिकांना मारू नका, पारदर्शकपणे काम करा, लोकांचे जीव वाचवा.
- आरकीदास अँथोनी
हेल्पलाईनवर काॅलची संख्या वाढल्याने पाच ऐवजी १० लाईन उपलब्ध केल्या जात आहेत. डॅशबोर्डवरची माहिती लवकर अपडेट न करणाऱ्या रुग्णालयांना नोटीसा पाठविल्या जाणार आहेत. नागरिकांना बेड त्वरीत उपलब्ध व्हावेत, त्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका
- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.