डंपरखाली चिरडुन महिलेचा मृत्यू; रुग्णवाहिका चालक अन् पोलिसांत वाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

कोंढवा परिसरातील डंपरच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी शहरात सकाळी 7:30 ते 7:45 च्या आसपास घडली. दरम्यान घटनास्थळी उपस्थित पोलिस आणि रुग्नवाहिकेचा चालकची बाचाबाची झाली. ​

पुणे : कोंढवा परिसराती डंपरच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी शहरात सकाळी 7:30 ते 7:45 च्या आसपास घडली. दरम्यान घटनास्थळी उपस्थित पोलिस आणि रुग्नवाहिका चालकाची बाचाबाची झाली. 

 सकाळी 7:30 ते 7:45  दरम्यान सय्यद जाफर (वय 58), हे त्यांची पत्नी नसरीन जाफर सय्यद (वय 50 वर्षे) यांच्यासह त्यांच्या होंडा डिओ गाडीवरून जात होते. त्यावेळी, कोंढवा मुख्य रस्त्यावरील संत गाडगे महाराज शाळेसमोरील शिवनेरीनगर येथील क्रॉसिंग जवळ डपंर (MH12 EF 1477) च्या चालकाने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. दुचाकीवरील नसरीन सय्यद यांच्या पोटावरुन व पायावरून डंपरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती बाजूला पडल्याने किरकोळ जखमी झाले आहेत.

कोंढवा परिसरातील या अपघाताबाबत नागरिकांनी पोलिसांना कळविले होते. परंतु, जवळपास अर्धा तास होऊनदेखील कोणतेही पोलीस कर्मचारी आले नव्हते. त्यानंतर एक कर्मचारी आला व त्याने 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन केला असता ते सुद्धा 15 मिनिटांनंतर आले. यावेळी रुग्ण वाहिकेतील डॉक्टरांनी संबधित महिलेला मृत घोषित केले. ते तेथून निघून जाऊ लागले. परंतु पोलिसांनी त्यांना मृत महिलेला ससूण हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. मात्र, आम्ही मृत व्यक्तीला या रुग्णवाहिकेत नेत नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे, पोलिस व रुग्णवाहिकेचा चालक यांच्यात बाचाबाची झाली. परंतु थोड्याच वेळात खासगी रुग्णवाहिका आल्याने पोलिसाने त्या रुग्णवाहिकेला जाऊ दिले.

दरम्यान, मृत महिलेच्या नातेवाईकांच्या आक्रोशाने येथील उपस्थित नागरिकांची मने हेलावली. बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाल्याने पोलिस सर्वांना बाजूला करत होते. तर येथील कोंढव्यातील ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते तेथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक सुरळीत करत होते. विशेष म्हणजे ज्या डंपरमुळे हा अपघात झाला त्या डंपरवर पुढील बाजूस नंबर प्लेटदेखील नव्हती.

वास्तविक कोंढवा गावठाणातून अवजड वाहतुकीला बंदी असतानादेखील अवजड वाहतूक सुरू आहे. त्यामुळे असे अपघात होत आहेत. तर आता मोठे टेम्पो तसेच इतर छोट्या वाहनांनाही कोंढवा गावातून बंदी करण्यात यावी अशी मागणी कोंढवा खुर्द ग्रामस्थांनी केली आहे. वीर नरवीर तानाजी मालुसरे चौकात मोठे बॅरिकेट्स लावावे, असेही काही नागरिकांनी सुचविले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman dies after crushing dumper at kondhwa in Pune