esakal | पुणे : आॅक्सिजन अभावी महिलेचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

covid19
पुणे : आॅक्सिजनअभावी भोर तालुक्यामधील महिलेचा मृत्यू
sakal_logo
By
किरण भदे ः सकाळ वृत्तसेवा

नसरापूर : आईची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली प्रकृती खालावली. आॅक्सिजनची पातळी 75 पर्यंत खाली आली. यासाठी मुलाने उपचारासाठी रुग्णालयाची शोधाशोध सुरु केली परंतू कुठेच आँक्सिजन व व्हेंटिलेटरचे बेड शिल्लक नव्हते. संपुर्ण भोर तालुका पिंजून काढला. ज्या ज्या ठिकाणी ओळख होती त्या त्या ठिकाणी फोन लावले, परंतू कुठेच बेड मिळेना. आईची तब्बेत मात्र खालावत चाललेली अशा आवस्थेत एका रुग्णवाहीकेत एक आँक्सिजन सिलेंडर घेवून पुणे-पिंपरीच्या कानाकोपऱ्यातील रुग्णालयात फिरुन बेडचा शोध घेतला. परंतू कुठेच आँक्सिजन बेड मिळाला नाही. तो पर्यंत रुग्णवाहीकेत घेतलेला आँक्सिजन संपत आला होता व अखेर संपला स्वतःच्या डोळ्यासमोर आईचा मृत्यू पाहण्याची वेळ मुलावर आली.

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर

नसरापूर येथील भाजपाचे कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य सुधीर शेडगे यांच्या आई सावित्रा वामन शेडगे (वय 70) यांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. दोन ते तीन दिवस त्यांची तब्बेत बरी नव्हती, म्हणून नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते, मात्र कोरोनाची लक्षणे दिसल्याने त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट (ता. 21 रोजी) पाॅझिटिव्ह आला आॅक्सिजन पातळी देखील 75 पर्यंत खाली आल्याने आँक्सिजन बेडची आवश्यकता निर्माण झाली.

हेही वाचा: जुन्नर नगर पालिकेच्या कोरोना योद्ध्यांची कामगिरी प्रशंसनीय

सुधीर शेडगे यांनी तातडीने नसरापूरमधील दोन्ही खाजगी रुग्णालयात बेडची चौकशी केली, परंतू दोन्ही रुग्णालयात आॅक्सिजन बेड शिल्लक नव्हते. भोर तालुक्यासह परिसरात व सातारा जिल्ह्यात देखिल बेड मिळत नव्हता. पुण्यात ओळखीच्या माध्यमातून ठिकठिकाणी फोन करुन चौकशी केली जात होती, मात्र बेड मिळत नव्हता. कोविड सेंटरचे फोन लागत नव्हते. शेवटी नसरापूर येथील सुर्यवंशी हाॅस्पिटलमध्ये विनंती करुन एक आॅक्सिजन सिलेंडर घेऊन सिध्दिविनायक हाॅस्पिटलची रुग्णवाहीका घेऊन त्यामध्ये सावित्रा यांना आँक्सिजन लावून बेड शोधण्यासाठी पुण्यात नेण्यात आले. दिलेला आॅक्सिजन सिलेंडर चार तासच चालणार होता. त्यावेळेत पुण्यातील अनेक रुग्णालयात जाऊन बेडची मागणी करण्यात आली, परंतू बेड मिळाला नाही. सुधीर शेडगे यांच्यासमवेत त्यांचे चुलत बंधू रविंद्र शेडगे, पुतणे विश्वजीत सत्यजीत व केदार यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली, परंतू कुठेही बेड मिळू शकला नाही. तोपर्यंत आॅक्सिजन संपत आलेला होता. या धावपळीतच शेवटी आॅक्सिजन संपला सावित्रा यांना जोराची धाप लागली व त्यांची प्राणज्योत मालवली. आईसाठी केलेल्या अथक प्रयत्न अपुरे पडले हे पाहून मुलाच्या भावनांचा बांध फुटला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शेवटी ससून रुग्णालयात आईचे पार्थिव नेऊन पुढील कार्यवाही करण्यात आली.