पुणे - मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरून ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत एका सायबर चोरट्याने महिलेची तब्बल तीन कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ‘लुकआउट’ नोटीस काढत या आंतरराष्ट्रीय सायबर चोरट्याला पुणे सायबर पोलिसांनी मुंबई विमानतळाहून अटक केली आहे..डॉ. रोहित ओबेरॉय ऊर्फ अभिषेक शुक्ला (मूळ भारतीय, सध्या स्थायिक- ऑस्ट्रेलिया) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत दिल्लीतील एक महिला तक्रार दिली होती. ही महिला खराडी येथे राहात असताना हा प्रकार घडला होता. याबाबत अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) पंकज देखमुख दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला तिच्या पहिल्या पतीकडून पाच कोटी रुपयांची पोटगी मिळाली होती..ती या पैशातून लहान मुलांसाठी विविध कार्यक्रम सुरू करणार होती. दरम्यान तिने शादी डॉट कॉमवर लग्नासाठी नोंदणी केली होती. २०२३ मध्ये आरोपीने डॉ. ओबेरॉय या नावाच्या प्रोफाइलद्वारे महिलेला मेसेज केला. स्वतःला ऑस्ट्रेलियात राहणारा डॉक्टर असल्याचे सांगून त्याने महिलेशी मैत्री केली. त्यानंतर तो पुण्यात आला. दोघे काही काळ पुण्यासह भारतात इतर ठिकाणी एकत्र राहिले..महिलेकडे असलेल्या पैशांची माहिती आरोपीला होती. त्यामुळे त्याने तिचा विश्वास संपादन करून, तिच्या व्यवसायासाठी सिंगापूरहून गुंतवणूक मिळवून देतो, असे सांगितले. त्यासाठी ‘इव्हॉन हँदायनी’ आणि ‘विन्सेंट कुआण’ नावाच्या बनावट लोकांची ओळख करून दिली. या तिघांनी मिळून महिलेला सिंगापूर आणि भारतातील विविध बँकांमध्ये टप्प्याटप्प्याने तीन कोटी ६० लाख रुपये भरायला लावले..पैसे मिळाल्यानंतर आरोपी ऑस्ट्रेलियाला गेला आणि महिलेशी संपर्क टाळू लागला. काही महिन्यांनी ‘विन्सेंट कुआण’ या नावाने महिलेला एक ई-मेल आला. त्यामध्ये ‘डॉ. रोहित’चा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. महिलेला त्याबाबत संशय आला. महिलेने मैत्रिणीला घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले..फसवणूक झाल्याचे कळाल्यावर महिलेने तत्काळ सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तपासात ‘डॉ. रोहित ओबेरॉय’ हे नाव बनावट असून, त्याचे खरे नाव अभिषेक शुक्ला असल्याचे समोर आले. तो मूळचा लखनऊचा असून सध्या ऑस्ट्रेलियात पर्थ येथे स्थायिक आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व स्वीकारले असून, तेथे लग्नही केलेले आहे. त्यास दोन मुले आहेत..अशी झाली अटक -आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली होती. तो २५ जूनला सिंगापूरहून मुंबई विमानतळावर येणार होता. त्याची माहिती ‘इमिग्रेशन ब्युरो’कडून पुणे सायबर पोलिसांना माहिती देण्यात आली. सायबर पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली.पोलिसांनी आरोपीला न्यायालयात सादर केले असता, त्याला २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे..सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलिस उप-निरीक्षक सुशिल डमरे, हवालदार बाळासो चव्हाण, संदीप मुंढे, नवनाथ कोंडे, सतीश मांढरे, संदीप यादव, संदीप पवार, अमोल कदम आणि सचिन शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली..३१९४ महिलांना मेसेज पाठवले -आरोपीने शादी डॉट कॉमवर खोटे प्रोफाइल तयार करून ३१९४ महिलांना मेसेज पाठवले होते. त्यामुळे आरोपीने अजून किती महिलांना फसवले आहे, याचा तपास सुरू आहे. आरोपीकडून (प्रोफाइल क्रमांक एसएच-८७३४१२३१) कोणाची फसवणूक झाली असेल, तर ७०५८७१९३७१/७५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पंकज देशमुख यांनी केले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.