एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेली अन्...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

एटीएम केंद्रातील मशीनमधून पैसे काढताना मदत करण्याच्या बहाण्याने एकाने महिलेच्या बँक खात्यातील साठ हजार रुपयांची रक्कम लंपास केली. अनोळखी व्यक्तीने हातचलाखी करुन एटीएम कार्ड बदलून आणि पीन क्रमांक घेऊन त्यांची फसवणूक केली.

पुणे : एटीएम केंद्रातील मशीनमधून पैसे काढताना मदत करण्याच्या बहाण्याने एकाने महिलेच्या बँक खात्यातील साठ हजार रुपयांची रक्कम लंपास केली. अनोळखी व्यक्तीने हातचलाखी करुन एटीएम कार्ड बदलून आणि पीन क्रमांक घेऊन त्यांची फसवणूक केली.

हा प्रकार शुक्रवारी दुपारी साडे चार वाजता पुणे स्टेशन येथील स्टेट बँकेच्या कार्यालयाजवळ घडली. याप्रकरणी सांगवी येथे राहणाऱ्या 43 वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुक्रवारी दुपारी साडे चार वाजता पुणे स्टेशन येथील स्टेट बँकेच्या मुख्य कार्यालयाजवळ असलेल्या एटीएम केंद्रामध्ये आल्या. तेथील मशिनमधून त्या पैसे काढत होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे थांबलेल्या व्यक्तीने त्यांना मदत करतो, असे सांगितले. त्यानंतर त्याने फिर्यादीच्या हातातील एटीएम कार्ड घेऊन मशीनमध्ये टाकले, त्यानंतर फिर्यादी यांना एटीएम पीन क्रमांक टाकण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी क्रमांक टाकला. मात्र पैसे आले नाहीत. त्यामुळे संबंधीत व्यक्तीने फिर्यादी यांना पुन्हा पीन क्रमांक टाकून प्रक्रिया करण्यास सांगितले. त्यानंतरही पैसे आले नाहीत. त्याने एटीएम मशीनमध्ये पैसे नसल्याचे फिर्यादीस सांगितल्यामुळे त्या तेथून निघून गेल्या. त्या काही अंतरावर असलेल्या बसथांब्यावर जात असतानाच त्यांच्या बँक खात्यातील दहा हजार रुपये दोन वेळा असे वीस हजार रुपये गेल्याचा मेसेज मोबाईलवर आला. त्यानंतर ऑनलाईन माध्यमाद्वारे त्यांच्या बँक खात्यातील 40 हजार रुपये एका अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर जमा झाल्याचा दुसरा मेसेज आला. अवघ्या काही मिनिंटातच महिलेच्या बँक खात्यातील 60 हजार रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ए.एम.पाटील करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A woman looted at ATM