woman Warkari Shaila Shirke from Pimpalgaon Baswant in Nashik district
woman Warkari Shaila Shirke from Pimpalgaon Baswant in Nashik district

महिला वारकऱ्यांची वारीत चांगली सोय : महिला वारकरी शैला शिर्के

सरकारने महिलांसह वारकऱ्यांसाठी जागोजागी शौचालये

पुणे - संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालख्यांसोबत शौचालयाची सुविधा नसायची. त्यामुळे महिला वारकऱ्यांची मोठी गैरसोय व्हायची. ही गैरसोय टाळण्यासाठी महिला वारकरी या पहाटेच उठून अंधारात जाऊन आडोशाला शौचाला बसावे लागत असे. यामुळे भीती वाटायची. यंदाच्या वारीत पूर्वीसारखी अशी भयावह स्थिती राहिलेली नाही. सरकारने महिलांसह सर्वच वारकऱ्यांसाठी आता जागोजागी शौचालये उभारली आहेत. मुक्कामाच्या गावी कचराकुंडी व स्नानगृहांची सोय केली आहे. परिणामी आम्हा महिला वारकऱ्यांची वारीत आता कसल्याही प्रकारची गैरसोय होत नाही, असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील महिला वारकरी शैला शिर्के सांगत होत्या.

पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने स्वच्छ भारत मिशन उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील पालखी मार्गावरील गावे आणि पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये वारकऱ्यांसाठी स्वच्छताविषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शिवाय ही गावे स्वच्छ व हागणदारीमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. यासाठी या गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामुळे ही गावे स्वच्छ व चकाचक झाली आहेत.

जिल्ह्यातून दरवर्षी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज या दोन प्रमुख पालख्यांसह अन्य विविध संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. या पालख्यांच्या निमित्ताने पालखी मार्गावरील गावांमध्ये एकाच दिवशी लाखो वारकरी गावात येतात. विसावा घेतात व मुक्काम करतात. स्थानिक ग्रामस्थ गावात आलेल्या वारकऱ्यांना सेवा देत असतात. शिवाय स्वच्छ भारत मिशन विभागाच्यावतीने पालखीच्यावेळी वारकरी व ग्रामस्थांचे स्वच्छतेबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. याचा परिणाम हा पालखी मार्गावरील गावात सगळीकडे स्वच्छता दिसण्यात झाला असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे यांनी सांगितले.

गावांतून ३३८ टन कचरा जमा

जिल्ह्यातील पालखी मार्गावरील आणि पालखी मुक्कामाच्या गावांमधून एकूण ३३७.८७ मेट्रिक टन कचरा जमा करण्यात जिल्हा परिषद प्रशासनाला यश आले आहे. या जमा केलेल्या एकूण कचऱ्यापैकी पालखीपुर्वी १८५.०७ टन आणि पालखीनंतर १५२.८० टन कचरा जमा करण्यात आला आहे. या एकूण कचऱ्यापैकी २६५.३५ टन ओला आणि ७२.५२ टन सुका कचरा आहे. हा कचरा जमा करण्यात स्थानिक ग्रामपंचायत, या गावांमधील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग आहे. जमा झालेल्या कचऱ्यापैकी ओला कचरा खत प्रक्रियेसाठी व सुका कचरा स्थानिक भंगार विक्रेत्यांना देण्यात आला आहे.

यापूर्वी पालखी दरम्यान गावात सगळीकडे अस्वच्छता असायची. गावात सर्वत्र उघड्यावर मानवी विष्ठा असायची. यामुळे पालखी येऊन गेल्यानंतर गावात किमान दोन आठवडे अस्वच्छता असायची. दुर्गंधी यायची. परिणामी साथीच्या रोगाची लागण होत असे. परंतु मागील पाच ते सहा वर्षांपासून जिल्हा परिषदेच्यावतीने स्वच्छता, पाणी, शौचालये, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यंदा गावात लाखो वारकरी आले. मात्र कचरा, स्वच्छता कुठेही दिसून येत नाही.

- तुकाराम दोरगे, ग्रामस्थ, दोरगेवाडी, ता. दौंड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com