पुणे : दातांचे ऑपरेशन करताना तरुणीचा मृत्यू 

PNE19P46780.jpg
PNE19P46780.jpg

पिंपरी : दातांचे ऑपरेशन करताना डॉक्‍टरांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. ही घटना प्राधिकरणातील स्टर्लिंग रुग्णालयात शनिवारी (ता. 4) घडली. नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. 

धनश्री बाजीराव जाधव (वय 19, रा. नेरे, ता. मुळशी) असे मृत तरुणीचे नाव आहे. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, दातांची वाढ योग्य रीतीने न झाल्याने त्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी धनश्रीला स्टर्लिंग रुग्णालयात 23 एप्रिलला दाखल केले. डॉ. राम पाटील यांनी 24 एप्रिलला दुपारी बारा वाजता तिला शस्त्रक्रियेसाठी शस्त्रक्रिया विभागात नेले. रात्री बारा वाजता तिला तेथून बाहेर आणले. त्या वेळी तिची प्रकृती गंभीर होती. तिला अतिदक्षता विभागात ठेवावे लागणार असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यानंतर धनश्री पुन्हा शुद्धीत आली नाही. शनिवारी सकाळी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. 

डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे धनश्रीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिचे काका कैलास जाधव यांनी केला. तसेच, जोपर्यंत संबंधित डॉक्‍टरांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी नातेवाइकांना लेखी तक्रार देण्यास सांगितले. लेखी तक्रार दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत डॉ. पाटील यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकला नाही. 

अहवाल आल्यावर कार्यवाही करणार 
धनश्रीवर केलेल्या उपचाराची कागदपत्रे ताब्यात घेतली असून, ती ससून रुग्णालयातील समितीकडे पाठविण्यात येणार आहेत. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश पवार यांनी सांगितले. 

शस्त्रक्रिया जिवावर बेतली 
धनश्री चार काका, दहा भाऊ आणि एक बहीण अशा एकत्र कुटुंबात राहत होती. तिच्या मोठ्या बहिणीचा 1 जून रोजी विवाह आहे. बहिणीच्या लग्नापूर्वी दातांवर उपचार करून घ्यावेत, असे धनश्रीला वाटत होते. त्यासाठी तिने स्टर्लिंग हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हाच निर्णय तिच्या जिवावर बेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com