रोखपालाकडून महिलेची 1 कोटी 88 लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

पुणे - सौंदर्यप्रसाधन निर्मितीच्या व्यवसायासाठी मदत करण्याच्या बहाण्याने खासगी बॅंकेच्या रोखपालाने महिलेची एक कोटी 88 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी महिलेने सायबर गुन्हे शाखेकडे फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीस तत्काळ अटक केली.

नीरज प्रभाकर टिळक (वय 45, रा.अमर पार्क सोसायटी, लोखंडे तालीमजवळ, नारायण पेठ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मुंढवा येथील 59 वर्षीय महिलेने या प्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे एचडीएफसी बॅंकेच्या कोरेगाव पार्क शाखेमध्ये खाते आहे. याच शाखेमध्ये टिळक हा रोखपाल म्हणून कार्यरत होता. त्यामुळे दोघांची ओळख होती. दरम्यान फिर्यादी यांना सौंदर्यप्रसाधन निर्मितीचा व्यवसाय करायचा होता. त्यामध्ये आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीसाठी मदत करण्याच्या बहाण्याने टिळक याने महिलेशी संपर्क वाढविला. त्यानंतर त्याने नोकरी सोडून खासगी वित्तीय कंपनी सुरू केली.

दरम्यान, टिळक याने फिर्यादी यांची स्वाक्षरी असलेले सहा धनादेश घेतले होते. त्याद्वारे त्याने महिलेच्या खात्यातील एक कोटी 88 लाख रुपये स्वतःच्या खात्यावर वळविले. त्या वेळी आपली फसवणूक झाली असल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुंढवा पोलिसांकडे तक्रार केली. सायबर गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास आल्यानंतर पोलिसांनी त्यास तत्काळ अटक केली.

Web Title: women cheating by cashier crime