अखेर तिला मृत्यूने गाठलेच...

Fire
Fire

पिंपरी - तिच्या छातीत चमका निघत होत्या. कोणताही धोका नको म्हणून तिने मध्यरात्री भाऊ, आई आणि मुलाला सोबत घेऊन फॅमिली डॉक्‍टरचा दवाखाना गाठला. पण दुर्दैवाने दवाखाना बंद होता. यामुळे अन्य रुग्णालयात उपचारासाठी ते चालले होते. मात्र, कुटुंबीयांचे प्रयत्न नियतीलाही मान्य नसावेत, रस्त्यात बंद पडलेली मोटार सुरू करताना अचानक पेट घेतला. तिला वाचविण्यासाठी कुटुंबीयांनी काही प्रयत्न करण्यापूर्वीच मोटारीला ज्वाळांनी वेढले आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. अखेर तिला मृत्यूने गाठलेच. ही घटना रविवारी मध्यरात्री वाकडमध्ये घडली.

संगीता मनीष हिवाळे (वय ४४, रा. सौंदर्य कॉलनी, नखातेवस्ती, रहाटणी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. संगीता आपल्या पतीपासून विभक्‍त झाल्यानंतर मुलगा सायमन (वय १५) आणि आई माया बोर्डे (वय ६५) यांच्यासह राहत होत्या. तळ मजल्यावर त्यांचा भाऊ जॉन बोर्डे कुटुंबीयांसोबत राहत आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्या कुरिअर कंपनीत नोकरीही करीत होत्या. 

आपल्या मुलाला आपली गरज आहे, हे ती माता जाणून होती. यामुळे प्रकृतीच्या बाबतीत त्या दक्ष होत्या. रविवारी रात्री त्यांच्या छातीत चमका निघत असल्याचे तिने मुलगा आणि आईला सांगितले. मुलाने आपल्या मामाला बोलावून आणले. त्यानंतर ते मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सर्व वाकड येथील फॅमिली डॉक्‍टरच्या दवाखान्यात गेले. मात्र, दवाखाना बंद असल्याने ते इतर रुग्णालयात जाण्यासाठी निघाले. वाटेत माया बोर्डे यांना लघुशंका आल्याने मोटार रस्त्याच्या कडेला थांबविली. त्या वेळी संगीता यांच्या भावाने ती पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला असता ती सुरूच होत नव्हती. त्या वेळी मुलगा सायमन यास मोटारीच्या मागील भागातून धूर येत असल्याचे दिसले. त्याने ही बाब मामाला सांगितली. मामाने मोटारीची डिक्‍की उघडून पाहिले असता अचानक भडका उडाला आणि क्षणार्धात संपूर्ण मोटारीने पेट घेतला. संगीता यांची आई, मुलगा आणि भाऊ हे मोटारीच्या बाहेर असल्याने ते बचावले. मात्र, संगीता यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे रहाटणी परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com