पुरंदरमधील कऱ्हा नदीत वाहून गेल्याने महिलेचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

पुरंदर तालुक्खयातील खळद येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाय घसरून पडल्याने कऱ्हा नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाला. कौशल्या चंद्रकांत खळदकर (वय 74) असे या महिलेचे नाव आहे. 

खळद (पुणे) : पुरंदर तालुक्खयातील खळद येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाय घसरून पडल्याने कऱ्हा नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाला. कौशल्या चंद्रकांत खळदकर (वय 74) असे या महिलेचे नाव आहे. 

कौशल्या खळदकर या आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास खळद येतील कऱ्हा नदीच्या पात्रातील पुरातन मोरी येथे कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी अचानक पाय घसरल्याने त्या नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या. या वेळी ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या सापडल्या नाहीत. ग्रामस्थांनी तहसीलदार व पोलिसांशी संपर्क करून शोधकार्यासाठी आवाहन केले.

दरम्यान, ग्रामस्थांनीही आपली शोध मोहीम सुरू ठेवली होती. अखेर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घटनास्थळापासून सुमारे शंभर ते दीडशे मीटर अंतरावर एका झुडपाला महिला अडकल्याचे काही तरुणांच्या निदर्शनास आले. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढले, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. 

दौंड- पुरंदरचे उपविभागीय महसूल अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार अतुल म्हेत्रे, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, मंडलाधिकारी प्रभावती कोरे, तलाठी बी. व्ही. आगे, ग्रामसेवक सुरेश जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. 

सरकारच्या वतीने खळदकर कुटुंबीयांना आपत्कालीन व्यवस्थापन निधीच्या माध्यमातून चार लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान उपविभागीय महसूल अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या माध्यमातून उद्या (ता. 6) सायंकाळपर्यंत तातडीने देणार असून, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून 2 लाख रुपये मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करणार आहे, असे तहसीलदार म्हेत्रे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women dies after drowning in river Purandar