

पाेलिसाला चिरडण्याचा
प्रयत्न; महिला ताब्यात
अंधेरी, ता. ३१ : अपघातानंतर वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करीत असताना वाहतूक पोलिसाला बीएमडब्ल्यू मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. संबंधित महिला चालकाने पोलिसाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ही घटना विलेपार्ले (पश्चिम) येथे घडली.
३० ऑक्टोबरला रात्री ८.१५ ते ८.३०च्या सुमारास एन. एस. रोड क्रमांक १० वरील संगीत महाभारती जंक्शनजवळ प्रतीक्षा बंगल्यासमोर हा प्रकार घडला. सांताक्रूझ वाहतूक विभागातील पोलिस शिपाई प्रशांत गोकूळ हाके हे गणवेशात वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत होते. या वेळी किरकोळ अपघात झाला. ही दोन्ही वाहने रस्त्याच्या मधोमध उभी असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. तेव्हा हाके यांनी दोन्ही वाहनचालकांना वाहने रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितले. तेव्हा बीएमडब्ल्यू मोटार चालक महिलेने त्यांच्या सूचनेचे पालन करण्यास नकार देत त्यांच्याशी वाद घातला. त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकीही दिली. हाके हे गणवेशात मोटारीसमोर उभे राहून वारंवार मोटार थांबविण्यास सांगत असतानाही महिलेने अचानक मोटारीचा वेग वाढवून त्यांना धडक देण्याचा प्रयत्न केला. हाके प्रसंगावधान राखून बाजूला झाले. त्यानंतर संबंधित महिला भरधाव वेगाने मोटार चालवत जेव्हीपीडी जंक्शनच्या दिशेने निघून गेल्याचा आराेप हाके यांनी तक्रारीत केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.