
गुरूवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने महिलेवर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले आहे.
बिबट्याचा जऊळके खुर्द येथे महिलेवर जीवघेणा हल्ला
जऊळके खुर्द (ता. खेड) - येथे गुरूवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने (Leopard) महिलेवर (Women) जीवघेणा हल्ला (Attack) करून गंभीर जखमी (Injured) केले आहे. लता शिवाजी बोऱ्हाडे (वय ४२) असे जखमी महिलेचे नाव असुन त्यांना उपचारासाठी पुणे येथील ससून रूग्णालयात दाखल केले आहे.
दोन दिवसांपूर्वीच मंगळवारी (दि.१०) रेटवडी येथे दोन बिबट्यांनी दीड तासाच्या अंतराने दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन महिलांवर हल्ला केला होता. तसेच बुधवारी सकाळी एका शेतकऱ्याच्या कुत्र्याचा फडशा पाडला होता. रेटवडी येथील एक महिला ससून रुग्णालयात अत्यवस्थ स्थितीत उपचार घेत असुन रेटवडीपासुन जवळच असलेल्या जऊळके येथे दुसरा हल्ला झाल्याने परिसरातील नागरिक घाबरून गेले आहेत.
लता बोऱ्हाडे या सकाळी सहा वाजता जऊळके गावठाणातील त्यांच्या जुन्या घरापासुन नवीन घराकडे जात असताना बिबट्याने अचानक मागून हल्ला केला. बिबट्याने बोऱ्हाडे यांच्या तोंडावर व डोक्याला पंजाने मारून व चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. बोऱ्हाडे यांनी आरडाओरडा केल्याने ग्रामस्थ जमा झाले त्यामुळे बिबट्या पळून गेला. ग्रामस्थांनी बोऱ्हाडे यांना तातडीने चांडोली येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले, मात्र डोक्याला झालेल्या जखमा खोल असुन जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पुणे येथे ससून रूग्णालयात दाखल केले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एस. रौंधळ, वन परिमंडळ अधिकारी दत्तात्रय फापाळे, शिवाजी राठोड, संदीप अरुण व शिवाजी ढोले यांनी जऊळके येथे भेट दिली. रेटवडी व जऊळके या शेजारील गावांमध्ये बिबट्याने दोन दिवसात तीन हल्ले केल्यामुळे पंचक्रोशीतील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे. रेटवडी येथे बुधवारी रात्री दोन वाजेपर्यंत बिबट्याने धुमाकुळ घातला अाहे. बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी ग्रामस्थांनी फटाके फोडून आरडाओरडा केला तरीही बिबट्या त्यास दाद देत नसुन रेटवडी व जऊळके येथील महिलांवर केलेल्या हल्ल्यात साम्य असल्याने सदर बिबट्या पिसाळलेला असावा किंवा नरभक्षक होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. रेटवडी येथील शेतकरी शेतातील कामे करण्यास जाण्यासाठी घाबरत आहेत. वनविभागाने या बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी रेटवडी व जऊळके ग्रामस्थांनी केली आहे.