महिला स्वच्छतागृहांचा अभाव

दीपेश सुराणा
गुरुवार, 17 मे 2018

पिंपरी - शहरामध्ये महिलांसाठी रहिवासी भाग, झोपडपट्टी क्षेत्र, उद्याने आदी ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उपलब्धता आहे. मात्र, चार प्रमुख बीआरटीएस रस्त्यांवर पुरुष व महिला मिळून केवळ २१ स्वच्छतागृहे आहेत. त्याशिवाय, अंतर्गत रस्त्यांवरही विदारक परिस्थिती पाहण्यास मिळते. या पार्श्‍वभूमीवर उद्योगांच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) उपक्रमांतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांवर महिलांसाठी नव्याने काही स्वच्छतागृह उभारण्याचे नियोजन आहे.

सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार दर एक किलोमीटरला एक सार्वजनिक स्वच्छतागृह असायला हवे. मात्र, सद्य:स्थितीत याबाबत दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक घरगुती स्वच्छतागृहांना जास्त प्राधान्य दिले आहे. पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते दापोडी या अंतरात निगडी, खराळवाडी, नाशिकफाटा आदी ठिकाणी यापूर्वी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारलेले आहे. संबंधित रस्त्यासह सांगवी-किवळे, नाशिकफाटा-वाकड, बोपखेल फाटा-आळंदी रस्ता आदी ठिकाणी नव्याने पुरुष व महिला यांच्यासाठी एकूण १८ स्वच्छतागृहे उभारली आहेत. काळेवाडी फाटा-देहू-आळंदी रस्त्यावर सध्या स्वच्छतागृहांचा अभाव आहे. विविध बसथांब्याशेजारी देखील स्वच्छतागृह नाहीत.

‘‘बीआरटीएस’ रस्त्यांवर उद्योगांच्या ‘सीएसआर’ उपक्रमांतर्गत महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याचे नियोजन आहे. आयुक्तांची मान्यता घेतल्यानंतर विविध उद्योगांना त्यासाठी निमंत्रित केले जाईल,’’ असे ‘बीआरटीएस’चे प्रवक्ते विजय भोजने यांनी स्पष्ट केले.

महिलांसाठी उभारलेली सार्वजनिक स्वच्छतागृहे
पालिका इमारती, उद्याने, अन्य - 455
झोपडपट्टी - 1074
रहिवासी क्षेत्र - 1327
स्वच्छ भारत अभियान - 203

हागणदारीमुक्त शहराचा टप्पा आपण पूर्ण केला आहे. नागरिकांची मागणी व गरज लक्षात घेऊन नवीन स्वच्छतागृह उभारले जातील. जागेची उपलब्धता, वीज, पाणी, सांडपाण्याची सोय आदी सुविधा असल्यास स्वच्छतागृह उभारणे शक्‍य होते.
- दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त 

बदलत्या जीवनशैलीनुसार महिलांचे कामानिमित्त घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्या सोयीसाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर, बसथांब्याशेजारी, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह असणे खूप गरजेचे आहे. फिरते स्वच्छतागृह ठेवूनही गरज भागवता येऊ शकते.
- अंजू सोनवणे, ज्येष्ठ शिक्षिका

Web Title: women toilet shortage in pimpri chinchwad