अपरात्री प्रवास करणाऱ्या महिलांना पोलिस संरक्षण 

संदीप घिसे
गुरुवार, 21 जून 2018

अपरात्री प्रवास करताना महिलेने पोलिस संरक्षणाची मागणी केल्यास तिला पोलिस बंदोबस्त देण्याचा उपक्रम पोलिसांनी सुरू केला आहे. 

पिंपरी (पुणे) - कामावर उशीर होत असल्याने किंवा रात्रीच्यावेळी विमानाची वेळ असल्यास अनेकदा एकट्या महिलांना रात्रीच्यावेळी प्रवास करावा लागतो. यापूर्वी वाहनचालकांकडून महिलांचा जीव धोक्‍यातही आला आहे. यामुळे रात्रीच्यावेळी प्रवास करण्यास महिलांना भीती वाटते. अपरात्री प्रवास करताना महिलेने पोलिस संरक्षणाची मागणी केल्यास तिला पोलिस बंदोबस्त देण्याचा उपक्रम पोलिसांनी सुरू केला आहे. 

एखाद्या कार्यक्रमास किंवा इतर कोणत्याही व्यक्‍तीस पोलिस संरक्षण पाहिजे असल्यास पोलिस आयुक्‍तांना अर्ज करावा लागतो. संबंधित व्यक्‍तीची गरज लक्षात घेऊन सशुल्क पोलिस बंदोबस्त दिला जातो. मात्र, त्यासाठी वेळ आणि पैसाही खर्च होतो. मात्र, विद्यमान पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. बडीकॉपच्या माध्यमातून प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलांचा व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार केला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची या ग्रुपवर नजर असते. एखाद्या महिलेस पोलिस संरक्षण किंवा इतर काही मदत लागल्यास महिला या ग्रुपवर मेसेज टाकतात. पोलिसही तत्काळ मदतीला धावून जातात. 

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना रात्री-अपरात्री प्रवास करावा लागतो. कधी कधी विमानाची वेळ मध्यरात्री किंवा पहाटेची असते. अशावेळी टुरिस्ट मोटारीतून प्रवास करताना महिलांना भीती वाटते. कंपनीकडून त्यांना मोटार व खासगी सुरक्षारक्षक उपलब्ध करून दिले जातात. मात्र, यापूर्वी मोटारीचा चालक आणि सुरक्षारक्षक यांच्या संगनमताने गुन्हे घडले असल्याने महिलांचा त्यांच्यावरही विश्‍वास नसतो. बडीकॉपच्या माध्यमातून महिलांनी मागणी केल्यास त्यांना विमानतळ किंवा शहरातील इच्छित स्थळापर्यंत पोलिस संरक्षण अगदी मोफत दिले जाते. 


"पोलिसांनी महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून दहावीतील विद्यार्थिनीला संपूर्ण परीक्षा काळात मोफत पोलिस संरक्षण पुरविले होते आणि ती चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाली. अशाच प्रकारे रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या महिलांनी मागणी केल्यास त्यांच्यासोबत महिला कर्मचारी किंवा पुरुष कर्मचारी संरक्षणाकरिता दिला जातो. तो कर्मचारी इच्छित स्थळापर्यंत महिलेच्या मोटारीतून प्रवास करतो. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र, गरज लक्षात घेऊन हा बंदोबस्त दिला जातो.'' - गणेश शिंदे, पोलिस उपायुक्‍त-परिमंडळ तीन

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Women who travel at latenight will get police protection