#Womenissues हिरकणींना अजूनही शोधावा लागतोय अाडोसा

प्रियांका तुपे
शुक्रवार, 6 जुलै 2018

पुणे - स्तनपान ही बाळासाठी आवश्‍यक बाब. गर्दीच्या ठिकाणी त्यासाठी विशेष कक्ष हवाच. असा कक्ष आता लोहगाव विमानतळावर सुरू झाला आहे. मात्र स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्थानकात हिरकणी कक्ष असूनही माहिती देणारे फलकच लावलेले नाहीत; तर रोज पाच-सात हजार नागरिक शिवाजीनगर न्यायालयात येत असूनही तेथे कक्ष अजूनही सुरू झालेला नाही. विविध ठिकाणांचा ‘सकाळ’’ने घेतलेला आढावा. 

पुणे - स्तनपान ही बाळासाठी आवश्‍यक बाब. गर्दीच्या ठिकाणी त्यासाठी विशेष कक्ष हवाच. असा कक्ष आता लोहगाव विमानतळावर सुरू झाला आहे. मात्र स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्थानकात हिरकणी कक्ष असूनही माहिती देणारे फलकच लावलेले नाहीत; तर रोज पाच-सात हजार नागरिक शिवाजीनगर न्यायालयात येत असूनही तेथे कक्ष अजूनही सुरू झालेला नाही. विविध ठिकाणांचा ‘सकाळ’’ने घेतलेला आढावा. 

शिवाजीनगर न्यायालयात दररोज पाच-सात हजार लोकांची ये-जा असते. त्यातील रेखा टोके एक. गर्दीतून रेखा यांच्याकडे लक्ष वेधले गेले, कारण त्यांच्या कडेवर त्यांचे बाळ भुकेने व्याकूळ होऊन रडत होते आणि त्या हतबल होत्या. बाळाला दूध पाजण्यासाठी त्या आडोसा शोधत होत्या, मात्र त्यांना अशी जागाच सापडत नव्हती, जिथे बसून त्यांना आपल्या बाळास स्तनपान करता येईल. त्यातून पुढे आले ती शिवाजीनगर न्यायालयातील उणीव. 

रेखा यांनी सांगितले, की गेल्या तीन महिन्यांपासून कोर्टात खेटे मारतेय. तिन्ही मुलांना सोबत घेऊन हडपसरवरून येते. कोर्टात ११ वाजता पोचले, तरी काम संपून घरी जायला चार- पाच तरी वाजतात. इतका वेळ लेकराला भूक आवरत नाही, त्यामुळे एखाद्या कोपऱ्यात झाडाखाली बसून कसे तरी बाळाला पाजते.

न्यायालयीन आवारात रडणारे तान्हे बाळ कडेवर घेऊन उभ्या असलेल्या माधुरी चौहान. त्यांचे बाळ आहे ९ महिन्यांचे. सकाळी ११ वाजल्यापासून त्या त्यांच्या दोन्ही मुलांना घेऊन न्यायालयात आल्या होत्या. त्यांनाही चार वाजेपर्यंत थांबावे लागणार होते, असे त्यांनी सांगितले. सकाळी कोर्टात येऊन काम चार वाजेपर्यंत संपले, तरी घरी पोचायला आणखी तास - दीड तास लागणार. इतका वेळ बाळाला दूध पाजण्यावाचून ठेवू शकत नाही. व्यवस्थाच नसल्याने कुठल्यातरी कोपऱ्यात बसावे लागते.

काहीच व्यवस्था नाही
रेखा आणि माधुरीसारख्या शेकडो महिला रोज न्यायालयात येतात. मात्र न्यायालयीन आवारात एकही स्तनपान कक्ष नाही. कौटुंबिक न्यायालयातही स्तनपान कक्षाची व्यवस्था नाही, तिथे येणाऱ्या पक्षकारांच्या लहान मुलांना पालकांशी बोलता यावे यासाठी एक पाळणाघर आहे, तिथे एखाद्या कोपऱ्यात स्तनपानासाठी महिलेला बसण्याची मुभा आहे, एवढीच काय ती व्यवस्था.  

पुणे विमानतळावर सुविधा
पुणे विमानतळावरून बाळाला घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विमानात बसण्यापूर्वी बाळाला स्तनपान कोठे करायचे, हा प्रश्‍न पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या आईसाठी आता सुटला आहे. या विमानतळावर स्तनपान कक्ष उभारण्यात आला आहे. 

या विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची रोजची संख्या वीस ते पंचवीस हजार इतकी आहे. देशातील नवव्या क्रमांकाच्या गर्दीचे म्हणून पुणे विमानतळ ओळखले जाते. या विमानतळावर आता ही सुविधा उपलब्ध झाली आहे. प्रवासात एकांत मिळत नसल्यामुळे बाळांना स्तनपान देण्यात अनेक अडचणी येतात. हे लक्षात घेऊन येथे ही सुविधा देण्यात आली आहे. या स्तनपान कक्षाचे उद्‌घाटन भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे प्रादेशिक कार्यकारी संचालक केशव शर्मा यांच्या हस्ते रविवारी झाले.  

पुणे विमानतळात टर्मिनल २ मध्ये हा कक्ष आहे. कक्षात २ महिला आपल्या बाळाला आहार देऊ शकतील, अशी व्यवस्था आहे. कक्षात टीव्हीची पण व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यात दृकश्राव्य माध्यमातून आईने बाळाला स्तनपान कसे करावे, याची माहिती देण्यात येईल. हा कक्ष गुप्ते हॉस्पिटलतर्फे उभारण्यात आला आहे.

आणखी दोन कक्ष आम्ही लवकरच आगमन आणि सुरक्षा कक्ष क्रमांक २ जवळ सुरू करणार आहोत. या कक्षात बाळाचा डायपर बदलण्याची सोयही उपलब्ध असेल.
- केशव शर्मा, प्रादेशिक कार्यकारी संचालक, भारतीय विमानतळ प्राधिकरण

Web Title: #Womenissues The court premises no breast feeding rooms