सांस्कृतिक कलाकेंद्र व दारुदुकानांच्या विरोधात रणरागिणी आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे महिलांच्या ग्रामसभेत महिलांनी नवीन दारु दुकाने तसेच सांस्कृतिक कलाकेंद्राला तीव्र विरोध दर्शवित आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनानेही गावात दारुबंदीचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविणार असल्याचे सांगितले.

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे महिलांच्या ग्रामसभेत महिलांनी नवीन दारु दुकाने तसेच सांस्कृतिक कलाकेंद्राला तीव्र विरोध दर्शवित आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनानेही गावात दारुबंदीचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविणार असल्याचे सांगितले.

कोरेगाव भीमा येथे आज सरपंच संगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत गावात कलाकेंद्राच्या दोन तर परमिट रुम व बियरशॉपीच्या दुकांनासाठी आलेल्या १९ अर्जांवर चर्चा सुरु असताना सरपंच सरपंच संगिता कांबळे व महिला सदस्यांनी मासिक सभेतच कलाकेंद्राचा अर्ज फेटाळला असल्याचे सांगत त्यास विरोध दर्शविला. तर उपस्थित महिलांनीही या प्रस्तावास सर्वानुमते विरोध दर्शविला. तसेच यापुर्वी सुरु असलेली परमिट रुम, बियरबारही बंद करण्यात यावीत, तर अवैध हातभट्टी व मटका व्यवसायही बंद करण्यात यावा, असा ठराव सौ. मीना शिवाजी ढेरंगे यांनी यावेळी मांडला. तर प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुमनताई ढेरंगे, माजी ग्रामपंचायत सदस्या मीना ढेरंगे, कृष्णाबाई गव्हाणे व भामाबाई गव्हाणे यांनी दारुदुकानांना परवानग्या न देता गावात दारुदुकाने बंद करण्याबाबतचा ठराव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविण्याची मागणी केली. उपस्थित महिलांनी हात उंचावून पाठींबा दर्शविल्याने ठराव मंजुर करण्यात आला. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सरपंच संगिता कांबळे व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी सांगितले.   

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील शेतकरी यादी वाचन झाल्यानंतर बाळोबा मंदीराचे प्रलंबित काम पुर्ण करण्याची मागणी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शुद्ध पाणी प्रकल्पाचा व अनूसुचित जाती जमातीसाठी आरक्षित विकासनिधीचाही हिशोबाबतही चर्चा झाली. त्यानंतर झालेल्या विशेष ग्रामसभेतही दारुदुकाने व कलाकेंद्राला विरोधांचे ठराव मंजुर करण्यात आले.        

सरपंचपदी असेपर्यत कलाकेंद्राला परवानगी देणार नाही - सरपंच
कोरेगाव भीमा येथे यापुर्वीही कलाकेंद्राला गावातील महिलांनी विरोध दर्शविल्याने अर्ज माघारी घेण्यात आला होता. मात्र आज पुन्हा कलाकेंद्रासाठीचे दोन अर्ज महीलांच्या ग्रामसभेत आल्याने महिलांनी त्याविरोधात आक्रमक होत एकमुखी विरोध केला. तर ‘माझा कलाकेंद्राला विरोधच असून मी सरपंच असेपर्यत तरी कलाकेंद्राला परवानगी देणार नाही,’ या शब्दात सरपंच संगिता कांबळे यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: womens are aggressor against art center and alcohol shop in Koregaon bhima