शहर विकासाच्या ध्येयाने काम करा - गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

पिंपरी - ""महापालिका निवडणूक संपल्यामुळे राजकारण बाजूला ठेवून शहर विकासाच्या ध्येयाने नगरसेवकांनी काम करायला हवे. महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आदर्श कारभार महाराष्ट्राला दाखवून देऊ,'' असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी केले. 

पिंपरी - ""महापालिका निवडणूक संपल्यामुळे राजकारण बाजूला ठेवून शहर विकासाच्या ध्येयाने नगरसेवकांनी काम करायला हवे. महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आदर्श कारभार महाराष्ट्राला दाखवून देऊ,'' असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी केले. 

महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपचे महापौर म्हणून नितीन काळजे यांची, तर उपमहापौर म्हणून शैलजा मोरे यांची निवड झाली. सभा संपल्यानंतर अभिनंदनपर मनोगतात बापट बोलत होते. खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे आदी उपस्थित होते. 

बापट म्हणाले, ""महापालिकेत भाजपचा पहिल्यांदाच महापौर होत आहे. हा ऐतिहासिक प्रसंग आहे. विरोधी पक्षनेते व त्यांच्या सहकाऱ्यांनी महापौर आणि उपमहापौरांच्या बिनविरोध निवडीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्येही आता सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून शहर विकासासाठी काम करावे.'' 

सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ""शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून आवश्‍यक निधी आणला जाईल. कोणत्याही प्रकारचे कटुतेचे राजकारण करणार नाही.'' 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते योगेश बहल म्हणाले, ""महापालिकेत यापुढील काळात विरोधाला विरोध ही आमची भूमिका नसेल, तर चांगल्या, विधायक कामांच्या पाठीशी आम्ही राहू. शहर विकासाच्या कामाला आमचे सहकार्य राहील. महापौरपदाची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे विनंती केली होती. त्याचा मान ठेवून राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी माघार घेतली.'' ""भाजपने महापौरपदासाठी ग्रामीण भागातील उमेदवार देऊन चांगली सांगड घातली आहे,'' असे मत मंगला कदम यांनी व्यक्त केले. अपर्णा डोके, वैशाली काळभोर, माई ढोरे, नामदेव ढाके, नीलेश बारणे, नीता पाडाळे, आरती चौंधे, आशा शेंडगे, अश्‍विनी चिंचवडे आदी सदस्यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. 

बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावा 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र महापालिका सभागृहात लावावे, अशी मागणी प्रमोद कुटे यांनी केली. ""ठाकरे यांच्या तैलचित्राचा ठराव यापूर्वी संमत झालेला आहे. त्यामुळे त्याबाबत कार्यवाही व्हायला हवी,'' अशी मागणी सीमा सावळे यांनी केली. 

Web Title: The work of the defense of the city development - bapat