सिंहगड रस्त्यावर ऐन पावसाळ्यात काम सुरू

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राजाराम पूल ते फन टाइम थिएटर दरम्यान उड्डाणपूल बांधला जात आहे.
Work on Sinhgad Road
Work on Sinhgad Road sakal
Summary

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राजाराम पूल ते फन टाइम थिएटर दरम्यान उड्डाणपूल बांधला जात आहे.

पुणे - सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल बांधला जात आहे. महापालिकेच्या व वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ कारभाराचा नमुना समोर आला आहे. सिंहगड रस्त्यावरील सर्वांत अरुंद असलेल्या ब्रह्मा व्हेज हॉटेल ते माणिकबाग पेट्रोल पंप या भागात ऐन पावसाळ्यात खांब उभारण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आल्याने फक्त दीड लेनचा रस्ता उपलब्ध झाला आहे. त्यावर बेशिस्त पार्किंग, अतिक्रमणामुळे एकच लेन उपलब्ध होत असल्याने वाहनचालक, पादचारी बेजार झाले आहेत. मात्र, यावर उपाययोजना करण्याकडे महापालिका व पोलिसांनी सोईस्कर दुर्लक्ष केले आहे.

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राजाराम पूल ते फन टाइम थिएटर दरम्यान उड्डाणपूल बांधला जात आहे. धायरीच्या दिशेने उड्डाणपुलाची लांबी २१२० मीटर, तर स्वारगेटकडे येणाऱ्या पुलाची लांबी १५४० मीटर इतकी असेल. दुहेरी वाहतुकीसाठी पुलाची रुंदी १६.३ मीटर आणि एकेरी वाहतुकीसाठी पुलाची रुंदी ८.१५० मीटर असणार आहे. भविष्यात मेट्रो मार्गिकेचा विचार करून आवश्यक ती जागा ठेवण्यात आली आहे, असे प्रशासनाकडून सांगितले गेले आहे. गेल्या चार पाच महिन्यांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. हिंगणे चौकापासून ते ब्रह्मा व्हेज चौकापर्यंत खांबांचे काम सुरू आहे. त्याच दरम्यान संतोष हॉल ते ब्रह्मा व्हेज या दरम्यानचे खांबांचे सध्याचे काम पूर्ण झाल्याने तेथे दोन्ही बाजूने केलेले बॅरिगेटींग काढून टाकल्याने कामामुळे होणारी वाहतूक कोंडी कमी झाली आहे. मात्र, नव्याने सुरू झालेल्या कामाने डोकेदुखी वाढली आहे.

ब्रह्मा व्हेज ते माणिकबागेतील पेट्रोलपंप या दरम्यान सिंहगड रस्त्याचे पूर्ण रुंदीकरण झालेले नाही. त्यामुळे तेथे पूर्वीपासूनच तेथे पादचारी मार्ग, सायकल मार्ग नाही. येथे कायम वाहतुकीचा गोंधळ असताना ऐन पावसाळ्यात या अवघड भागात खांब उभारण्याचे काम सुरू केले. दोन्ही बाजूला बॅरिगेटींग केल्याने दोन्ही बाजूच्या एक एक लेन वाहतुकीसाठी बंद झाल्या आहेत. उरलेल्या दीड लेनमधून वाहतूक जाण्याची व्यवस्था केली असली तरी या रस्त्याच्या दोन्ही बाजूने पार्किंग, दुकानदारांना जाळ्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे.

म्हणे कोंडीचे ‘रिपोर्टिंग’च नाही

पाऊस सुरू झाल्यानंतर या रस्यावरील वाहतूक संथ होऊन माणिकबागेत वाहतूक कोंडी होत आहे. गेल्या आठवड्यात २० जून रोजी झालेल्या पावसामुळे स्वारगटेच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची रांग वडगावच्या कॅनॉलपर्यंत गेली होती, तर धायरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरही लांब रांगा होत्या. त्यामुळे धायरी, खडकवासला, नऱ्हे, वडगाव या भागातून येणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रासाला पावसाळ्यात सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या वाहतूक कोंडीचे आमच्याकडे रिपोर्टींगच झाले नाही, नागरिकांनी तक्रार केली नाही, असा धक्कादायक दावा पोलिस निरीक्षक उदयसिंग शिंगाडे यांनी केला आहे.

अडथळे काढले; पण रस्त्यात खिळे

संतोष हॉल ते ब्रह्मा व्हेज या दरम्यानचे दोन्ही बाजूचे बहुतांश बॅरिकेड काढून घेतल्याने रस्ता मोठा झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. पण या बॅरिकेड घट्ट बसविण्यासाठी रस्त्यामध्ये ड्रील करून लावलेले लोखंडी खिळे काढलेले नाहीत. जवळपास २० ते २५ ठिकाणी हे खिळे असून, दुचाकीस्वारांच्या पायाला हे खिळे लागत आहेत. याकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष झाले आहे.

आकडे बोलतात

  • ११८.३७ कोटी - उड्डाणपुलासाठी खर्च

  • २१२० मीटर - उड्डाणपुलाची लांबी

  • १६.३ मीटर - उड्डाणपुलाची रुंदी

  • ३६ महिने - (पावसाळा सोडून) कामाचा कालावधी

हे करणे आवश्‍यक

  • दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढून, दुकानांपुढील लोखंडी जाळ्या काढणे

  • रस्ता अडवून थांबणारे टेम्पो व इतर चारचाकींचे पार्किंग बंद करणे

  • खड्डे बुजवून रस्ता चांगला करून घेणे

  • पादचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी आवश्‍यक

सध्याची स्थिती

  • अरुंद रस्त्यावर पिलर घेण्याचे काम सुरू

  • दोन्ही बाजूने बॅरिकेडिंग केल्याने दीड लेन वाहतुकीसाठी शिल्लक

  • उपलब्ध रस्त्यावर अतिक्रमण व बेशिस्त पार्किंग

  • विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकींमुळे वाहतूक कोंडी

ब्रह्मा व्हेज ते पेट्रोलपंप दरम्यान रस्ता लहान आहे, पण पोलिसांकडून उशिरा ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याने (एनओसी) हे काम आत्ता सुरू झाले. पावसाळ्यात येथे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी या रस्त्यावर नो पार्किंग करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. तसेच अतिक्रमण काढून घेतले जाईल.

- अजय वायसे, कार्यकारी अभियंता, प्रकल्प विभाग, महापालिका

महापालिकेकडून नो पार्किंगचा प्रस्ताव आल्यावर त्यावर निर्णय घेतला जाईल. ज्या ठिकाणी रस्ता मोठा आहे, तेथेच काम करण्याच्या सूचना महापालिकेला आहेत. कोंडी झाल्यास एनओसी रद्द केली जाईल अशी अट टाकली आहे.

- उदयसिंग शिंगाडे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा

‘कोणी पुसेना कोणाला’

प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. दासबोधात म्हटल्याप्रमाणे ‘मता मतांचा गल्बला, कोणी पुसेना कोणाला’ अशीच स्थिती सर्वत्र झाली आहे. ‘म्हणे मी मोठा शहाणा, ज्ञानेवीण दैन्यवाणा’ दासबोधातील या वचनाचीही येथे आठवण होते. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उड्डाणपूल उभारला जात आहे. पण सध्या जो कारभार सुरू आहे, त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत प्रतिक्रिया नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com